आष्टी (शहीद ) -/सृजनशील व बलशाली राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अनादी काळापासून गुरूंचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. भारतीय संस्कृतीला टिकवून अनेक राष्ट्र पुरुषांना घडविण्याचे महत कार्य शिक्षकांनी केले आहे. त्यामुळे गुरु शिवाय सृजनशील बलशाली राष्ट्राचे स्वप्न अपूर्ण आहे. असे विचार सुमित वानखेडे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. ते आष्टी येथे अनुलोम द्वारा आयोजित शिक्षक दिनानिमित्त शिक्षक स्नेह मिलन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. सुभाष लोहे, प्राचार्य राम बालपांडे, प्राचार्य शहेजाद अहेमद अब्दुल अजीज, मुख्याध्यापक गुणवंत जाणे, आयोजक प्रा. गुणवंत मानमोडे, विनोद सोनोने उपस्थित होते.
सुमित वानखेडे पुढे बोलताना म्हणाले जगात जे विकसित राष्ट्र आहेत ते विकसित करण्यात त्या त्या देशातील नागरिकांचे महत्वाचे योगदान आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत आपले राष्ट्र विकसित करायचे असेल तर महान नागरिक घडवावे लागतील, व महान नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी घ्यावी लागेल.
याच शिक्षक स्नेह मिलन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना प्राध्यापक सुभाष लोहे यांनी भारतीय संस्कृतीला ऋषी मुनींनी देखील प्राचीन काळी गुरु दीक्षा आणि शिक्षा देऊन विद्यादानाचे पवित्र कार्य केले. दोन हजार वर्षाचा इतिहास लक्षात घेता आजचा शिक्षक म्हणजे हा पूर्वीच्या काळातील ऋषीमुनी यांच्या विचाराचा वारसदार आहे. तो वारसा जिवंत ठेवण्याचे काम शिक्षकांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे केले आहे. असे विचार व्यक्त केले.
आष्टी येथील धर्यशील सभागृहात अनुलोम संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुखदुःखाच्या चर्चा व्हाव्या या उद्देशाने स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा युवा नेते सुमित वानखेडे तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.सुभाष लोहे, हुतात्मा राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राम बालपांडे,जवाहर उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शहेजाद अहमद सर, झोडे कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक गुणवंत जाणे आदींनी मंचावर उपस्थित राहून शिक्षक स्नेह मिलन सोहळ्याला संबोधित केले. याच सोहळ्यात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सुमित वानखेडे व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचा परिचय भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. गुणवंत मानमोडे यांनी केले. माजी मुख्याध्यापक तथा सरपंच विनोद सोनोणे यांनी आभार मानून राष्ट्रवंदने नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲड. मनिष ठोंबरे, अनिरुद्ध दंडाळे, राहुल लाखे, आकाश खोपे, साहिल ठाकरे, भुवनेश पराडकर, मयुर राजगुरू यांनी परिश्रम घेतले.