दोन तारखेला मतदार संघातील कार्यकर्ते रॅलीकरिता सज्ज..
वर्धा /लोकसभा निवडणुकीकरिता महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला विदर्भातून एकमेव जागा सुटली.शरद पवार यांनी वर्धेची जागा प्रतिष्ठेची केली असून अमर काळे यांना जिंकून आनायचेच असा निर्धार केला आहे.पक्षाची विदर्भाची जबाबदारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्यावर अनेक वर्षापासून आहे. राष्ट्रवादी पक्षाला वर्धा मतदार संघात सर्वसमावेशक उमेदवार मिळत नव्हता. तेव्हा अनिल देशमुखांनी आपल्या सख्ख्या भाच्याला म्हणजेच आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवार म्हणून निवडण्यात यश आले.मामा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने माजी आमदार अमर काळे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला काँग्रेसकडून ही जागा सुटली पाहिजे याचे प्रयत्न झाले. परंतु, नंतर मामांच्या प्रेमापोटी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. अनिल देशमुख त्यांच्याकरिता वर्धा मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची आहे. त्यामुळेच अमर काळे यांना खासदार करण्याची भिस्त आता खुद्द मामांच्या खांद्यावर आली आहे.त्यासाठीच आज वर्धा येथे इंडिया अलायन्सची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख व आघाडीच्या इतर पक्षातील नेते एकत्र येत आहेत. अमर काळे यांच्या आईचा स्मृती दिवस दोन एप्रिल रोजी आहे. या स्मृतीदिवशी आदरांजली वाहत अनेकांत स्वाध्याय मंदिर वर्धा येथून रॅली काढत काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.या रॅलीमध्ये गाव खेड्यापासून प्रत्येक तालुका तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते नागरिक उपस्थित राहणार असल्याची तयारी दिसून येते.