भुगाव च्या स्टील कंपनीत कामगाराचा मृत्यू बेल्टमध्ये आल्याने झालाय मृत्यू
प्रमोद पाणबुडे / वर्धा :
वर्ध्यातील उत्तम गालवा कंपनी मध्ये एम एन डी या भागात कन्वर्ट बेल्ट मध्ये दबून एका ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे भुगावच्या उत्तम गालवा येथील स्टील कंपनीतील कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनेमुळे कामगारांमध्ये संताप असून सेफ्टी उपकरणे आणि येथे वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यावर नाराजी व्यक्त केली जात आहेय.
या घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव कमलेश गजभिये असून तो भंडारा येथील राहणारा आहेय. तो मागील दहा वर्षापासून उत्तम गालवा कंपनी भुगाव येथे ऑपरेटर या पदावर काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो मिक्सिंग अँड नेड्यूलायझिंग ड्रम विभागात रात्रपाळी ची ड्युटी करत होता. दरम्यान अचानक बेल्ट मध्ये पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. जेथे दोन पेक्षा अधिक माणसांची गरज आहे तेथे एकावरच काम भागविले जातेय. बऱ्याच वेळेनंतर ही घटना तेथील हेल्परच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने संबंधित विभागातील सर्व कर्मचारी येऊन मशीन बंद केली व कन्व्हर्टर बेल्ट मध्ये दबून असलेला मृतदेह बाहेर काढताना अर्धा तास उशीर लागला. शवविच्छेदन करण्यासाठी सेवाग्राम रुग्णालयात आणण्यात आलेय. हा सर्व प्रकार होऊनही कंपनीच्या संचालक मंडळातर्फे विचारपूस करण्यात आली नसल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी सर्व कर्मचारी वर्गांनी केली आहे.