🔥हिंगण्यात बेरोजगारी, वीज दरवाढ आणि भूमी अभिलेख घोटाळ्यावर राष्ट्रवादीचे आंदोलनाचे संकेत
हिंगणा -/एकेकाळी देशाच्या आर्थिक विकासात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत थेट पाचव्या क्रमांकावर फेकला गेल्याने राज्याच्या आर्थिक स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत राज्य आर्थिक डबघाईला आल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हिंगणा तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात मांडलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ३ लाख १७ हजार ८०१ रुपये असून, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांच्या मागे महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यांचे उत्पन्न २ लाखांपेक्षाही कमी असल्याने आर्थिक विषमता वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. औद्योगिक घसरण आणि धोरणात्मक अपयशामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटत असल्याचा आरोपही करण्यात आला.
🔥बेरोजगारीचा स्फोट; तरुणांमध्ये नाराजी.
‘स्टेट ऑफ वर्किंग इंडिया’ अहवालाचा दाखला देत बंग यांनी सांगितले की, देशातील कोट्यवधी पदवीधरांपैकी मोठा वर्ग बेरोजगार आहे. दरवर्षी लाखो तरुण शिक्षण पूर्ण करत असले तरी त्यांना रोजगार मिळत नसल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप करत, ८० टक्के स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी करण्यात आली.
🔥महावितरणची वीज दरवाढ; ग्राहकांची लूट ?
महावितरणच्या वाढत्या वीजदरांवरही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मुंबईतील खाजगी कंपन्यांच्या तुलनेत महावितरणचे दर प्रचंड जास्त असल्याचे सांगत, १०० युनिटपासून ते ५०० युनिटपर्यंतच्या दरांमध्ये मोठी तफावत असल्याचे नमूद करण्यात आले. लाखो ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकणारी ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
🔥भूमी अभिलेख विभागात ‘ध चा मा’; शेतकरी व नागरिक त्रस्त
हिंगणा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अनियमिततेवर गंभीर आरोप करण्यात आले. ७/१२ उतारे, फेरफार आणि नकाशांमध्ये चुकीची नोंद, मालक बदलणे, क्षेत्रफळात फेरबदल अशा प्रकारांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘ध चा मा’ प्रकार थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
पेरणीच्या हंगामात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत, साठेबाजी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली.
जर शासनाने तातडीने या सर्व प्रश्नांवर तोडगा काढला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
या वेळी माजी आमदार विजय घोडमारे, बबनराव आव्हाळे, प्रमोद बंग, उमेशसिंग राजपूत, विलास वाघ, इनायतुल्ला शेटे, श्यामबाबू गोमासे, रामकिशोर महल्ले, हनुमंत दुधबळे, नारायण डाखळे, युनूसखा पठाण, प्रभाकर लेकुरवाळे, नामदेव पडोळे, सुरेश शेंडे, मंगला लोखंडे, साधना बलवीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.