हिंगणघाट -/कितीही आणि कोणतेही सरकार विकासाच्या नावाने कितीही बोंबा ठोको,अखेर ग्रामीण जनतेच्या नशिबी लागलेले ग्रहण काही सुटत नाही ते नाहीच.अशीच एक दुर्दैवी घटना आज सकाळी शुक्रवार रोजी घडली.समुद्रपूर तालुक्यातील धूम्मनखेडा येथील एक गर्भवती महिला उमरेड आगाराच्या बसने हिंगणघाटच्या रुग्णालयात प्रकृती दाखविण्या साठी येत असतांना हिंगणघाट जवळील नंदोरी चौकात तिला प्रसव वेदना झाल्या.व बस मध्येच तिची प्रसूती झाली.प्रसंगाचे गांभीर्य ओळखून बसचे चालक विक्रम काटकर,वाहक शेषराव कांढरकर यांनी त्वरित बस उपजिल्हा रुग्णालयात आणली.व महिलेला प्रसूतीगृहात दाखल केले.या ठिकाणी आईची व बाळाची तपासणी करण्यात आली असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.सदर दुर्दैवी मातेवर उपचार सुरु आहेत.यावेळी आगार व्यवस्थापक शेंडे बसस्थानक प्रमुख शेडमाके,प्रदीप शेंडे यांनी रुग्णालयात येऊन मातेची भेट घेतली.घटनेची माहिती मिळताच रुग्णसेवक सूरज कुबडे यांनी घटनास्थळ गाठून सदर कुटुंबिना मदत केली.रुग्णालयात ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती रुग्णांना योग्य वेळी उपचारासाठी मिळत नसून महिलांसाठी दोन ॲम्ब्युलन्स राखीव आहेत.पण आळशी पणा वा कामचुकारपणा मुळे 102 या क्रमांकवर फोन केला तर चक्क ॲम्बुलन्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सुरज कुबडे यांनी केला असून चार महिन्यापूर्वी वेळा येथील एका महिलेसाठी रुग्णालयातील 102 वर कॉल केला असता ॲम्बुलन्स उपलब्ध असूनही ती नाही असे खोटे सांगण्यात आली परिणामी सदर महिलेला खासगी ऍटोतून दवाखान्यात नेत असतांना ती ऍटो मध्येच प्रसूत झाली होती.त्यामुळे सदर ॲम्बुलन्स ला जीपीएस ट्रॅकर लावण्यात यावा अशी मागणी रुग्णसेवक सूरज कुबडे, व वन्यजीवरक्षक राकेश झाडें यांनी केली आहे.