हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगण सिद्धी येथे एकवटणार !
बिडकीन -/ माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरुक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव सर्वात मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक १८ ऑगष्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५.०० पर्यंत राळेगण सिद्धी ता.पारनेर जि.अहमदनगर येथे आयोजित केले असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विस्वास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे. राळेगण सिद्धी हे माननीय अण्णा हजारे यांचे गाव असून मा.अण्णा हजारे यांचे माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून असलेले योगदान पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. राळेगण सिद्धी ही जागरुक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ते यांची पंढरी असून या विकास आणि ज्ञान पंढरीमध्ये १८ऑगष्ट २०२४ रोजी राज्याच्या सर्व जिल्हे व विभागातून सुमारे पाचशे पेक्षा अधिक माहिती अधिकार कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.
या अधिवेशनात कार्यकर्त्यांना मा.अण्णा हजारे यांचे प्रेरणादाई मार्गदर्शन होणार आहे.तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ मा. विवेक वेलणकर,यशदा प्रशिक्षण संस्थेमधील माहिती अधिकार केंद्राचे संयोजक व संशोधन अधिकारी मा.दादू बुळे, तसेच यशदाच्या माहिती अधिकार प्रशिक्षका रेखा साळुंके यांचे उपस्थित कार्यकर्त्याना अमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे. शासन व प्रशासन पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त असावे व त्यांत नागरिकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूने मा.अण्णा हजारे व अन्य समाजधुरीणांच्या अविरत संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम २००५ साली अस्तित्वात आला आहे. मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावीपणे राबवण्यिासाठी शासन व प्रशासन स्तरावर खूपच आनास्था असल्याचे दिसून येत आहे. हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी होणे व या कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज असून जागरूक व प्रमाणिक नागरिकाचा मोठा दबाव गट निर्माण झाला तरच माहिती अधिकार कायद्यांच्या अंमलबजावणीतील दोष कमी होतील. व शासन व प्रशासनातील जनतोचा सहभाग वाढून प्रशासन पारदर्शक व जबाबदारीने काम करील. या साठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालूच आहेच असे सांगून या अधिवेशनामध्ये जागरुक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर आणि शेखर कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी केले आहे.