आर्णी -/ जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून, पोलीस प्रशासनावर गुन्हेगारांपेक्षा ‘अर्थपूर्ण’ संबंधांचे वर्चस्व अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा प्रिया शिंदे (तोडसाम) यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देऊन आर्णीत सुरू असलेल्या मटका, जुगार आणि ड्रग्जच्या विळख्याबद्दल गंभीर इशारा दिला होता. मात्र, या निवेदनानंतर गुन्हेगारांवर कारवाई होण्याऐवजी, भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना ‘मसिहा’ ठरवण्यासाठी दलाल आणि कुंटणखाना चालवणाऱ्या तथाकथित पत्रकारांची फौज कामाला लागली आहे.
प्रिया शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले होते की, आर्णी शहरासह जिल्ह्यात मटका आणि जुगार खुलेआम सुरू आहे. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. लोणबेहळ परिसरातील एका पंजाबी हॉटेलमध्ये ‘एम.डी.’ (ड्रग्ज) जप्त झाल्याची घटना ताजी असतानाही, पोलीस यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे की जाणूनबुजून डोळेझाक करत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
अचंबित करणारी बाब म्हणजे, एसपी कुमार चिंता यांनी या निवेदनाची दखल घेऊन धडक कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती उलट झाली आहे. तक्रारीनंतर अवैध धंदे बंद होण्याऐवजी मद्य, रेती तस्करी, भिंगरी आणि ड्रग्जची विक्री अधिक जोमाने सुरू झाली आहे. याला प्रशासनाचे अभय म्हणायचे की अक्षम्य दुर्लक्ष?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे पोलीस अधिकारी निलेश सुरडकर यांची प्रतिमा उजळण्यासाठी सुरू असलेला आटापिटा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्णीत पत्रकारीतेच्या नावाखाली कुंटणखाना आणि चमेलीचा धंदा चालवणारा एक दलाल सध्या सुरडकरांचे ‘पीआर’ सांभाळत आहेत. ज्यांच्यावर गुन्हेगारी कृत्यांचे शिक्के आहेत, तेच आता वृत्तपत्रातून पोलिसांच्या ‘कर्तव्यदक्षतेच्या’ बातम्या पेरत आहेत.
भाड्याने घेतलेल्या आणि नैतिकतेचा लवलेशही नसलेल्या या ‘भाडखाऊ’ पत्रकारांमार्फत स्वतःला स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी म्हणून मिरवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सध्या सुरू आहे. ज्या शहरात मुलींचा व्यापार करणाऱ्यांचे आणि दलालांचे पोलिसांशी ‘घरोब्याचे’ संबंध असतात, तिथे सामान्य माणसाला न्याय मिळेल का? हा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. प्रिया शिंदे यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला होता की, जर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याला जेव्हा स्वतःच्याच सरकारमधील पोलीस प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट होते.
मटका आणि जुगाराला कोणत्या ‘अदृश्य शक्तींचे’ संरक्षण लाभले आहे, असा सवाल निवेदनात विचारला गेला होता. आज ते अदृश्य हात आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आर्णीतील त्या ‘पंजाबी हॉटेल’मधील ड्रग्ज कनेक्शनचे धागेदोरे नेमके कोणापर्यंत पोहोचले? आणि तक्रारीनंतरही गुन्हेगारांचे मनोबल वाढवणारे ‘ते’ पोलीस अधिकारी नेमके कोणाचे लाडके आहेत? याचा हिशोब यवतमाळची जनता मागणार आहे.
जर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्वरित या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर आणि अवैध धंदेवाल्यांवर जरब बसवली नाही, तर येणाऱ्या काळात ‘आर्णी पॅटर्न’ हा केवळ गुन्हेगारीसाठीच ओळखला जाईल, यात शंका नाही.