राजकारणामुळे देऊळघाटच्या विकासाचा खेळ खंडोबा…

0

🔥राजकारणामुळे देऊळघाटच्या विकासाचा खेळ खंडोबा.

बुलढाणा -/ बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले ऐतिहासिक वारसा लाभलेलं देऊळघाट गाव आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. स्वातंत्र्याला ७९ वर्षे पूर्ण होऊनही गावात आजतागायत मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. मुस्लिम बहुल असलेल्या या गावाचा वापर केवळ व्होट बँक म्हणूनच झाला असून विकास मात्र कागदावरच अडकून पडला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
देऊळघाट गावाच्या सुरुवातीलाच पैनगंगा नदीचे पात्र आहे. मात्र या नदीत पाणी कमी आणि घाण व दुर्गंधी अधिक दिसून येते. तीस ते पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत उपकेंद्र आहे पण मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहू शकले नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. देऊळघाट मध्ये कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. याठिकाणी कपडे घेण्यासाठी पंचक्रोशीतील व इतर भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात.
दर शुक्रवारी देऊळघाटमध्ये मोठा बाजार भरतो. मात्र बाजार भरतो ते ठिकाण अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून, घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गावात बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असली तरी शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे. काही शिक्षक शिक्षणाकडे दुर्लक्ष करून खरेदी-विक्री व कमिशनच्या व्यवसायात गुंतल्याच्या तक्रारी असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
गावात दर्जेदार रस्ते व नाल्यांचा अभाव आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. त्यातच पाण्याचे टँकर रस्त्यात उभे राहिल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यासाठी आजही देऊळघाटमधील नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामपंचायतीकडे नळपट्टी भरूनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. गावात सध्या सुमारे चाळीसच्या आसपास टँकरद्वारे पाणी विक्री करणारे व्यावसायिक असल्याचे चित्र आहे. अनेक राजकीय नेत्यांनी नळाद्वारे पाणीपुरवठ्याची आश्वासने दिली, मात्र ती आश्वासने हवेतच विरून गेली.
या जिल्हा परिषद सर्कलमधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा राजकीय उदय झाला. जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करूनही देऊळघाटचा पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. येळगाव येथून पाणी आणण्याचा प्रयत्न करून काही ठिकाणी नळ बसविण्यात आले, मात्र शाश्वत तोडगा निघाला नाही. तीन वेळा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनाही हा प्रश्न सोडवता आला नाही.
सध्या दुसऱ्यांदा आमदार झालेले आ. संजय गायकवाड यांनी तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. गावातील ‘विरोधासाठी विरोध’ या राजकारणामुळे सामान्य जनतेचा नाहक बळी जात असल्याचा आरोप होत आहे.
दर जिल्हा परिषद निवडणुकीत देऊळघाटच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे जाहीरनामे नागरिकांना पाठ झाले आहेत. त्यामुळे आता देऊळघाटवासीयांना फसवे जाहीरनामे नको असून, प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या नेतृत्वाचीच गरज गरज आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 बुलढाणा,वर्धा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!