🔥हेच ते रेल्वे मालधक्क्यावरून अल्ट्राटेक व अंबुजा सिमेंटची ओव्हरलोड वाहतुक जोमात,मात्र आरटीओ अधिकाऱ्यांची डोळेझाक!
खामगाव -/रेल्वे मालधक्क्यावरून अल्ट्राटेक व अंबुजा सिमेंटसह इतर मालांची ओव्हरलोड वाहतुक जोमात सुरु आहे. दर महिन्याला हजारो क्विंटल सिमेंट, धान्य आणि युरिया खत ट्रकद्वारे जिल्हाभर पाठविण्यात येत आहेत. मात्र, या वाहतुकीकडे आरटीओ अधिकाऱ्यांची डोळेझाक आणि हप्तखोरीची संमती मिळाल्यामुळे नियमांचे खुले उल्लंघन होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव रेल्वे मालधक्क्यावरून अल्ट्राटेक व अंबुजा सिमेंट आणि इतर मालांची वाहतुक क्षमता ओलांडून केली जात आहे. अल्ट्राटेक व अंबुजा सिमेंटच्या ट्रकांसह इतर वाहनेही रस्त्यावर अधिक वजन घेऊन धावत आहेत. या वाहतुकीचे प्रमाण इतके वाढले आहे की, सहा चाकी वाहने 18 ते 20 टन आणि दहा चाकी वाहने 28 ते 30 टन माल वाहत आहेत, जे नियमाच्या दृष्टीने पूर्णपणे अवैध आहे. आरटीओ अधिकारी अशा ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करण्याऐवजी, ट्रक मालकांकडून दर महिन्याला हप्ते वसूल करतात. प्रत्येक ट्रकासाठी 2500 ते 3000 रुपये हप्ता घेतल्याचे सांगितले जात आहे. हे पैसे थेट एजंटद्वारे आरटीओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याची विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.
या वाहतुक नियमांची पूर्णपणे पायमल्ली होत असून, अनेक ट्रक चालकांकडे आवश्यक कागदपत्रे, फिटनेस सर्टिफिकेट, प्रदूषण प्रमाणपत्र नाहीत. तरीही, हप्ते याची देवाणघेवाणी झाल्यावर तो ट्रक रस्त्याावर धावत आहेत.
“आता तर आरटीओ अधिकाऱ्यांनी डोळेझाक करणे सुरू केले आहे. प्रत्येक ट्रक मालक हप्ते देऊन आपली वाहतुक सुरु ठेवतो, आणि या सर्व प्रक्रियेत वाहतुक सुरक्षा व नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खामगाव शहरात ओव्हरलोड ट्रकांची वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली असून आरटीओ अधिकाऱ्यांच्या हप्तखोरीमुळे वाहतुक नियमांच्या उल्लंघनाला अनुकूल वातावरण मिळाले आहे. या समस्येवर उच्च अधिकारी लक्ष देऊन तातडीने कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट
अल्टाट्रेक व अंबुजा कंपनीचा रॅक लागल्यावरही आरटीओची कारवाई करण्यास टाळाटाळ; मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण केले पुढे
सहासीकचे दैनिक चे जिल्हा प्रतिनिधी मुबारक खान यांनी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अल्टाट्रेक व अंबुजा कंपनीचा रॅक रेल्वे मालधक्यावर लागल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. मात्र, सुरुवातीला अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप खान यांनी केला आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी “सध्या आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे, त्याामुळे तातडीने कारवाई करणे शक्य नाही,” असे सांगितल्याचेही त्यांनी सांगितले. या उत्तरामुळे संबंधित प्रकरणात तात्काळ कारवाई होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मनुष्यबळाच्या अभावाचे कारण पुढे करून कारवाई टाळली जात असल्याची चर्चा सुरू आहे. संबंधित विभागाकडून याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित आहे.