🔥लाडखेड येथील भीषण हत्याकांडाचा २४ तासांत छडा अनैतिक संबंधातून ‘काटा’ काढणाऱ्या पती-पत्नीला बेड्या!
यवतमाळ -/ यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, भरवस्तीत आणि शेतशिवारात रक्ताचे पाट वाहू लागले आहेत. लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघापूर शिवारात एका तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचे प्रेत फेकण्यात आले होते. या अत्यंत संवेदनशील आणि थरकाप उडवणाऱ्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावून आरोपी पती-पत्नीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी वाघापूर शेतशिवारात एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून आणि चाकूने सपासप वार करून या तरुणाची क्रूर हत्या केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तपासाअंती मृताची ओळख आतिश सुभाषराव देशमुख (वय ३६, रा. गोविंद नगर, यवतमाळ) अशी पटली.
पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयाची सुई मृताच्या नात्यातील व्यक्तींकडे वळवली. तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. मृत आतिश याचे आरोपी महिला रुपाली अंकुश खोडे हिच्याशी जुने प्रेमसंबंध होते. या संबंधातून आतिश हा रुपालीला वारंवार त्रास देऊन तिचा पती अंकुश नागोराव खोडे याला जीवे मारण्याची धमकी देत होता. या जाचाला कंटाळून आणि आतिशचा काटा काढण्याच्या उद्देशाने खोडे दांपत्याने त्याचा गेम करण्याचा कट रचला. १४ मार्चच्या रात्री आरोपींनी आतिशला वाघापूर शिवारात बोलावून घेतले. तिथे पती-पत्नीने संगनमत करून आतिशवर चाकूने हल्ला केला आणि दगडाने त्याचे डोके ठेचून त्याला जागीच ठार केले. रक्ताने माखलेला हा मृतदेह तिथेच टाकून आरोपी पसार झाले होते. मात्र, कायद्याच्या हातापासून ते वाचू शकले नाहीत.
यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवली. आणी आरोपी १) अंकुश नागोराव खोडे (वय ४३) २) रुपाली अंकुश खोडे (वय ३८)
(दोन्ही रा. दांडेकर लेआउट, यवतमाळ) यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात सतिश चवरे, सपोनि पवन राठोड, पोलीस अंमलदार बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर व इतर पथकाने ही कामगिरी फत्ते केली.