🔥मृतक भारत नागपाल…..वर्धा नदीच्या रेती घाटाच्या व्यवहारातून खून; सात जणांवर गुन्हा, तिघांना पोलिस कोठडी. वरोरा-हिंगणघाट-/ वरोरा पोलिसांनी वर्धा नदीतील बामर्डा येथील रेती घाटाच्या आर्थिक व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून झालेल्या खूनप्रकरणी सात नामजद आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृत भरत दयानंद नागपाल यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर मारहाण करून जखमी अवस्थेतच नदीपात्रात फेकून दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हिंगणघाट येथील पंकज केशवराव वानखेडे (३९) व त्यांच्या भागीदाराने बामर्डा, ता. वरोरा येथील वर्धा नदीचा रेती घाट शासकीय लिलावातून मूळ भद्रावती (सद्य नागपूर) येथील गितेश सातपुते यांच्याकडून २ कोटी ५ लाख रुपयांत घेतला होता. संबंधित रक्कम मे २०२५ मध्ये बँक खात्यात जमा करण्यात आली होती. घाटाचा करार ९ जून २०२६ पर्यंत वैध होता.
मात्र, २५ जानेवारी २०२६ रोजी सातपुते यांनी घाट परत घेत उर्वरित ९८ लाख ६४ हजार ६२१ रुपये २८ फेब्रुवारीपर्यंत परत देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. याच रकमेतून वाद निर्माण होऊन हा प्रकार घडल्याची शक्यता पोलिस तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात कलम १०३(१), १०९(१), १२६(२), १८९(४), १९०, १९१(३), १९२ व ३२४(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अटक आरोपींमध्ये सावंगी मेघे (जि. वर्धा) येथील सुनील नारायण झोरे, गांधी नगर (वर्धा) येथील प्रफुल सूर्यभान उमाटे आणि त्रिमूर्ती नगर, उमरी मेघे (वर्धा) येथील अतुल पुरुषोत्तम मोटघरे यांचा समावेश आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.