वर्धा -/महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात मान्यताप्राप्त असलेल्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने १९९६ पासून सातत्याने मराठीतील दर्जेदार पुस्तकांना विविध वाङ्मय पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे त्रिदशक वर्ष असून काही अपरिहार्य अडचणीमुळे सन २०२१, २०२२ व २०२३ या तीन वर्षाचे पुरस्कार राहिलेले होते, त्या तीन वर्षाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते व पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ.राजेंद्र मुंढे यांनी केली आहे. ह्या सर्व पुरस्कार वितरण पुढील महिन्यात होणाऱ्या संस्थेच्या वार्षिक व्याख्यानमाला व साहित्य सोहळ्यात सन्मानपूर्वक केल्या जाणार आहेत. जाहीर झालेले हे पुरस्कार तीन वर्षाचे असून खालील प्रमाणे आहेत. संस्थेतर्फे त्या काळातील उत्कृष्ट कादंबरीचा बाबा पद्द्मनजी कादंबरी पुरस्कार- अनुक्रमे ,२०२०- २१, २०२२ व २०२३ ईश्वर हलगरे, पुणे ‘आरसा’, विजय जाधव, सांगली ‘पाऊसकाळ’ व सुरेश पाटील, मुंबई, यांच्या ‘अंतपार’ या साहित्य कृतीना दिला जाणार आहे. संस्थेतर्फे त्या त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट कथासंग्रहास बापूरावजी देशमुख कथासंग्रह पुरस्कार दिले जातात ते २०२० २०२१ साठी डॉ. भास्कर बड़े, लातूर, यांच्या ‘बाईचा दगड’, २०२२ चा डॉ. अशोक कौतिक कोळी, धुळे यांच्या ‘कडीबंदी आणि २०२३ साठी डॉ. प्रतिभा जाधव,नाशिक यांच्या ‘दहा महिन्याचा संसार’ या कथासंग्रहास जाहीर झाला आहे. संत भगवान बाबा काव्यसंग्रह पुरस्कार समकालीन काव्य प्रवाहतील उल्लेखनीय काव्यसंग्रहासाठी दिला जातो, तो २०२०-२१ चा नामदेव कोळी, मुंबई, यांच्या ‘काळोखाच्या कविता’, २०२२ अजीम नवाज राही, साखरखेर्डा, यांच्या ‘तळमळीचा तळ’ आणि २०२३ साठी ललित अधाने, संभाजीनगर, ‘माही गोधडी छप्पन भोकी’ या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. बाल साहित्य लेखनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूतून ‘पद्माकर श्रावणे बालसाहित्य पुरस्कार’ दिले जातात, २०२०-२१ प्रतिभा सराफ, मुंबई ‘मिठू मिठू’, २०२२-वैजनाथ अनमुलवाड, नांदेड,’रंग सारे मिसळू द्या!’ आणि २०२३ – सुमन नवलकर, मुंबई, ‘रोज नवी गोष्ट हवी’ या पुस्तकांना दिले जाणार आहेत.
इतर कोणत्याही भाषेतून मराठीत अनुवादित पुस्तकाला गेल्या सात वर्षापासून अनुवाद पुरस्काराने गौरव केला जातो, तो २०२०-२१ प्रमोद मुजुमदार, पुणे, ‘उम्मने कुलसुम (कुलसुम पारेख ),२०२२-पृथ्वीराज तौर/स्वाती दामोदरे, नांदेड, यांनी संयुक्तपणे अनुवादित केलेल्या ‘स्त्रीकोश : भारतीय स्त्री कविता’ व २०२३ रचना, अहिल्यानगर, यांच्या यज्ञ आणि इतर कविता (पारमिता षडंगी ) यांना देण्यात येईल. मराठीतील स्त्रीवादी साहित्य व चळवळीला प्राधान्य देणाऱ्या साहित्याकृतीस अंजनाबाई इंगळे
स्त्रीवादी साहित्य पुरस्कार दिला जातो तो २०२०-२१ डॉ. दादा गोरे, संमाजीनगर, ‘स्त्रियांचे समकालीन साहित्य’, २०२२ डॉ. सुनीता सावरकर, ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ आणि २०२३ चा किरण डोंगरदिवे, मेहकर, यांच्या ‘काव्य प्रदेशातील स्त्री’ या पुस्तकास दिला जाईल.
कादंबरी, कथा, कवितासंग्रह व बाल साहित्य पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे असून अंजनाबाई इंगळे स्त्रीवादी साहित्य पुरस्कार हा दहा हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असा आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन गृह व प्रतिथयश लेखकांकडून प्राप्त साहित्य कृतीतून उत्कृष्ट पुस्तकाची निवड केली जाते, असे निमंत्रक डॉ. राजेंद्र मुंढे यांनी सांगितले.
सदर पुरस्कार वितरण समारंभ मार्च महिन्यात मान्यवर साहित्यिकाच्या उपस्थितीत वर्धा येथे संपन्न होणार असून त्याबद्दल स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. वरील माहिती डॉ. राजेंद्र मुंढे, उपाध्यक्ष प्रो. शेख हाशम व सचिव संजय इंगळे तिगावकर यांनी दिली आहे.