🔥वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड
🔥अप.क्र. ४८/२०२६ मध्ये.डॉ. अरुण वानखेडे वर ‘पॉक्सो’सह कलमांची वाढ; तपास पोक्सो सेल कडे वर्ग
वर्धा-यवतमाळ -/वर्धा तालुक्यातील सावंगी मेघे परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड झाली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासोबतच आता ‘पॉक्सो’ कायद्यानुसारही कलमांची वाढ करण्यात आली आहे.
सावंगी मेघे येथील रहिवासी डॉक्टर दाम्पत्याची मुलगी अनन्या (नाव बदललेले) हिने ६ डिसेंबर २०२५ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तिच्या आईने पतीविरुद्ध मानसिक व शारीरिक छळाचे आरोप करत तक्रार दिली होती. त्यानुसार सावंगी मेघे पोलीस स्टेशन येथे अप.क्र. ४८/२०२६ अन्वये कलम १०८ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १२.४५ वाजता सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या ठाणे दैनंदिनी क्रमांक ००१ मध्ये महत्त्वाची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक पंकज गजानन वाघोडे यांनी केलेल्या नोंदीनुसार, फिर्यादी सौ. सुषमा अरुण वानखेडे यांनी आपल्या आईसह पोलीस स्टेशनमध्ये येऊन पूरक जबाब दिला. त्यामध्ये आरोपी अरुण उत्तम वानखेडे यांनी मागील सहा वर्षांपासून मुलगी नक्षत्रावर अनुचित स्पर्श, अनैतिक वर्तन तसेच अश्लील व्हिडिओ दाखविणे यासारख्या प्रकारचे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(१) (i) (iii) (iv) तसेच ‘लहान मुलांचे लैंगिक शोषण व अत्याचारापासून संरक्षण कायदा, २०१२ (POCSO)’ अंतर्गत कलम ८ व १२ ची वाढ करण्यात आली आहे.
तसेच पुढील तपास पोक्सो सेल, उपविभाग वर्धा यांच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक व संबंधित न्यायालयास लेखी स्वरूपात कळविण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पुढील तपासात नेमकी कोणती तथ्ये समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.