🔥वानाडोंगरीत बेकायदेशीर मोबाईल टॉवर उभारणीचा गंभीर आरोप – नागरिकांच्या जीविताशी खेळ, प्रशासन मात्र गप्प!
हिंगणा -/ वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १०, जाटाम ले-आऊट परिसरात एका खासगी व्यक्तीच्या घरावर VI कंपनीचा मोबाईल टॉवर परवानगीशिवाय व नियम डावलून उभारण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाकडे कडक तक्रार अर्ज दाखल केला असून, नागरिकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सदर परिसर हा घनदाट लोकवस्तीचा असून येथे लहान मुले, महिला, वृद्ध, आजारी नागरिक वास्तव्यास आहेत. असे असताना कोणतीही लेखी संमती, सार्वजनिक सूचना, सर्वेक्षण किंवा परवानगी न घेता टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले. असा स्थानिक नागरिकांनि केल्यानंतरही काम थांबवले गेले नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
विशेष म्हणजे, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी नगर परिषद वानाडोंगरी येथे लेखी तक्रार देऊनही ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट, काही वेळ काम थांबवून पुन्हा सुरू करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेवर व दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
🔥तक्रार अर्जात नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की > “बेकायदेशीर टॉवर उभारणीमुळे आरोग्यविषयक धोके निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.”
🔥नागरिकांनी पुढील मागण्या केल्या आहेत.
🔥सदर मोबाईल टॉवरचे काम तात्काळ बंद करावे.
संबंधित कंपनी व मालकावर कायदेशीर कारवाई करावी
नगर परिषद अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची स्वतंत्र चौकशी करावी
भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कडक आदेश द्यावेत
जर तातडीने कारवाई झाली नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन, माध्यमांद्वारे आवाज उठवणे आणि उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रश्न एकच – नागरिकांचा जीव महत्त्वाचा की कंपन्यांचे हित? प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.