अल्लीपूर -/स्थानिक इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये वर्धा जिल्ह्यातील पोलिस विभागा तर्फे तसेच दक्ष नागरिक फाउंडेशन व दामिनी पथक वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने गुन्हेगारी संबंधी जनजागृती करण्याच्या निमित्ताने विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक नरेश येडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.26सप्टेंबर ला विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रकाश खंडार (दक्ष नागरिक फाउंडेशन वर्धा जिल्हा ), सर्व धर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार तुकारामदास घोडे महाराज, (ग्रामीण कार्याध्यक्ष ) , प्रशांत कोसूरकर (जिल्हा संघटक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.डाहुले ठाणेदार पोलीस स्टेशन अल्लीपूर यांनी आपल्या भाषणात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे याला आळा घालण्यासाठी समुपदेशन महत्वाचे आहे. मुलींनी सायबर गुन्ह्यापासून दूर राहावे. मोबाईल, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम यापासून आपल्याला दूर ठेऊन पुस्तकांशी दोस्ती करावी. मोबाईल हा विद्यार्थी जीवनात सर्वात घातक शत्रू आहे म्हणून त्याच्यासोबत दोस्ती न करता पुस्तकं वाचा तसेच आपल्या परिसरात जर अनुचित प्रकार घडत असेल किंवा गुड टच आणि बॅड टच काय याबाबत सतर्क राहावे. वेळीच ओळखून अशी तक्रार आमच्याकडे द्यावी यासाठी आम्ही सदैव आपल्याला मदत करेल. तसेच एखाद्याला आर्थिक, शैक्षणिक मदत लागल्यास तेही मदत करणार असे घोषित केले.यानंतर घोडे महाराज यांनी आपल्या प्रबोधनातून विद्यार्थ्यांना आई वरील गीत सादर करून मंत्रमुग्ध केले, तसेच आत्मसंरक्षण, वाढणारी गुन्हेगारी, मुलींवर होणारे अत्याचार, मोबाईल गुन्हेगारी, दुष्परिणाम, सायबर गुन्हेगारी, यापासून वेळीच मुलींनी सावध राहावे, म्हणजेच विद्यार्थ्यावर वाईट प्रसंग, अत्याचार, गुन्हेगारी प्रवृत्ती रोखता येईल. तसेच प्रकाशजी खंडार यांनी वर्धा जिल्हा व शांतता प्रस्तावित जिल्हा म्हणून ओळखला जाईल याकरिता आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे व पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.सायबर गुन्हेगारी कशाप्रकारे होतात, फर्जी फोन कॉल यापासून सावध राहण्याचे सूचित केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात नरेश येडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहून आपले ध्येय व उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेऊन पुढे वाटचाल करावी असे सांगितले.यानंतर प्रशांत कोसूरकर यांनीही दक्ष नागरिक फाउंडेशनची जबाबदारी काय आहे आणि जर परिसरात घटना घडल्यास आम्हाला फोन करावा आम्ही लगेच मदतीसाठी तयार असणार असे सांगून फोन नंबर दिल्या गेले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कामडी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.