🔥वृद्ध शेतकऱ्याची बँक मॅनेजरकडून फसवणूक? १० लाख रुपये थेट खाजगी कंपनीकडे वळते केल्याचा गंभीर आरोप…!
हिंगणा -/हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीतील लखमापूर गावातील वृद्ध शेतकरी शिवाजी चिमणाजी भलावी (वय अंदाजे ८० वर्षे) यांच्या खात्यातील तब्बल १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेती गेल्यानंतर शासनाकडून मोबदल्याच्या स्वरूपात मिळालेली रक्कम त्यांनी आमगाव देवळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जमा केली होती.
ही रक्कम खात्यात असल्याचे लक्षात येताच त्या शाखेत त्या काळात कार्यरत असलेल्या महिला बँक मॅनेजर श्रुती बोरकर यांनी शेतकरी शिवाजी भलावी यांना बँकेत बोलावून “एफडी करा, चांगले व्याज मिळेल” असे सांगितल्याचा आरोप आहे. शेतकरी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तयार झाले आणि आवश्यक कागदपत्रांवर सह्या देखील केल्या. मात्र, त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत बँक मॅनेजरने ही संपूर्ण रक्कम परस्पर खाजगी कंपनीकडे वळती केली, अशी तक्रार शेतकऱ्याने पोलिसांकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १२ ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्याच्या खात्यातून पाच लाख बावीस हजार पाचशे रुपये खाजगी कंपनीकडे पाठवण्यात आले. त्यानंतर पुढील वर्षी एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पुन्हा शेतकऱ्याच्या खात्यातून ५ लाख ११ हजार २५० रुपये खाजगी कंपनीकडे वळते करण्यात आले.
यावेळी संशय आल्याने शेतकरी भलावी यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांना “ही एफडीच आहे आणि पाच-सहा वर्षांनी पूर्ण रक्कम मिळेल” असे सांगण्यात आले. मात्र, काही काळानंतर बँक व्यवस्थापनावरचा विश्वास उडाल्याने त्यांनी खात्यातील रक्कम कमी करत वापरण्यास सुरुवात केली.
दरम्यान आता जवळपास पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वृद्ध शेतकरी रक्कम काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या भरलेल्या रकमेचा पूर्ण परतावा मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणात शेतकऱ्यांनी वकिलामार्फत रिझर्व बँक, बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आमगाव शाखा यांना देखील लेखी तक्रार सादर केली असून “माझे भरलेले संपूर्ण पैसे व्याजासहित परत देण्यात यावे आणि संबंधित मॅनेजरवर कठोर कारवाई करण्यात यावी” अशी मागणी केली आहे.
शिवाजी भलावी यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे की, “आमच्या अडाणीपणाचा फायदा घेत आमची फसवणूक करण्यात आली. माझ्यासारख्या अशिक्षित लोकांची बँकेत पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून कारवाई करावी.”
या प्रकारच्या अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी नागरिकांनी ग्राहक पंचायत, ग्राहक न्यायालय किंवा न्यायालयीन मार्गाने दाद मागितल्यास न्याय मिळू शकतो, असे मत मल्लिका गोयंका (वकील, उच्च न्यायालय नागपूर) यांनी व्यक्त केले आहे.