🔥वैदर्भीय कन्या वैशाली राऊत यांची राज्य प्रबंधकपदी नियुक्ती,नर्सिंग शिक्षण मंडळाच्या पहिल्या प्रबंधक पदाचा बहुमान.
वर्धा -/राज्यातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक पदी वैदर्भीय कन्या असलेल्या वैशाली बेबीताई छत्रपती राऊत उर्फ वैशाली प्रविण राऊत यांची राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. राज्यसरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सदर स्वायत्त संस्थेच्या पहिल्या पूर्णवेळ प्रबंधक पदी विराजमान होण्याचा बहुमान वैदर्भीय कन्येला प्राप्त झाला आहे.राज्यातील खाजगी आणि शासकीय व निमशासकीय संस्थांच्या माध्यमातून नर्सिंग क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुण तरुणींना नर्सिंग क्षेत्रातील महत्वाचे मानल्या जाणाऱ्या एएनएम आणि जी एन एम या पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळ या स्वायत्त संस्थेची सण 2018 रोजी स्थापना केली आहे. या मंडळाच्या माध्यमातून जवळपास 1200 पेक्षा अधिक मान्यताप्राप्त विद्यालयातून नर्सिंग पदविका अभ्यासक्रमासाठी भारतीय परिचर्या परिषदेच्या निकषानुसार शिक्षण व प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मागील 2 वर्षांपासून सहप्रबंधक पदी प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या व प्रबंधक पदाचा अतिरीक्त पदभार सांभाळत असलेल्या अधिपरिचारिका वैशाली राऊत यांनी मंडळाच्या माध्यमातून विविध सुधारणा करीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियमावली करून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यालयाच्या गैरकारभाराला मोठ्याप्रमाणात आळा बसायला सुरुवात झाली असून रुग्णसेवेचे शिक्षण व प्रशिक्षण दर्जेदार व गुणवत्तापूर्वक मिळावे यासाठी विविध कठोर निर्णय घेतले आहे. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना राज्यात,देशात व परदेशात नोकरीची संधी मिळत असल्याने त्यांना मूळ प्रमाणपत्र तात्काळ तपासता यावे यासाठी ऑनलाईन प्रमाणपत्राचा उपक्रम सुरु केला आहे. त्याच बरोबर परीक्षापासून तर प्रशासकीय कामकाजातात अधिक पारदर्शकता राहावी यासाठी विविध उपाययोजना निर्माण केल्या आहे.
त्यामुळे त्यांच्या नर्सिंग क्षेत्रात दीर्घ अनुभव, प्रशासनिक दृष्टी आणि गुणवत्ता वृद्धीची धडाडी यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री हसन मुश्रीफ यांनी वैशाली राऊत यांना प्रबंधक पदी प्रतिनियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका अधिपरिचारिकेला प्रबंधक पदाची जबादारी देऊन अधिपरिचारिका संवर्गावर विश्वास दर्शवल्याने राज्यातील अधिपरिचारिका वर्गातून आनंद आणि अभिमान व्यक्त होत आहे.
वैशाली राऊत यांचा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वासी येथे जन्म झाला असून त्या देवळी तालुक्यातील अंदोरी येथील स्नुषा आहे. त्यांचे नागपूर येथील माधुरीताई देशमुख नर्सिंग विद्यालयातून जीएनएम पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथील तेरणा नर्सिंग महाविद्यालयातून एमएससी नर्सिंग पदवी संपादन केली.
अकोला, नागपूर आणि मुंबईतील शासकीय रुग्णालयांत अधिपरिचारिका म्हणून काम करताना त्यांनी प्रशासकीय कौशल्य आणि शैक्षणिक दृष्टी दोन्ही विकसित केले. प्रतिनियुक्तीवर पाठ्यनिर्देशिका म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळेच आपल्या अनुभवाच्या जोरावर मंडळाच्या सहप्रबंधक म्हणून प्रतिनियुक्तीने कार्यरत असताना व प्रबंधक पदाचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळत विविध कठोर निर्णय घेतले. या कालावधीत त्यांनी –
नर्सिंग पदविका शिक्षणाची नवीन नियमावली, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक केली असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत
गैरप्रकार करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई केली.
त्यांच्या कठोर पण सकारात्मक निर्णयांची दखल मुंबई उच्च न्यायालयानेही गैरकृत्य करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा मंडळाचा निर्णय योग्य ठरविला. म्हणून सोलापूर येथील सामाजिक संस्थेकडून त्यांना पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
राज्यात 1200 पेक्षा अधिक विद्यालयातून 1 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे सदर व्यापक यंत्रणेची जबाबदारी वैशाली राऊत यांचेवर दिली असून त्या मंडळाच्या पूर्णवेळ प्रबंधक म्हणून कार्यरत राहणार आहे. ग्रामीण विदर्भातून राज्यस्तरावर झेप घेतलेल्या वैशाली राऊत यांची ही नियुक्ती केवळ वैयक्तिक यश नाही, तर नर्सिंग क्षेत्रातील हजारो विद्यार्थिनींसाठी आणि अधिपरिचारिकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिपरिचारिका संवर्गातील प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र परिचर्या परिषद येथे शासन नियुक्त सदस्य म्हणून कार्यरत आहे.