देवळी -/डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला वाघिनीचे दुध म्हटले आहे. मात्र ते दुधच विद्यार्थ्यांना मिळत नसेल तर मग विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढणार तरी कशी हा प्रश्न चिकणी येथिल पालकांसमोर उभा ठाकला आहे.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिकणी येथे वर्ग १ ते ७ पर्यंत शाळा असून या वर्गांमध्ये एकूण ६८ विद्यार्थी आहेत.शिक्षण विभागामार्फत शाळेमध्ये ३ शिक्षिक नियुक्त केले आहे.मात्र त्यापैकी एक शिक्षक हे दुर्धर आजाराने ग्रस्त असून गेल्या शैक्षणिक वर्षापासून दिर्घ रजेवर आहेत व दुसरे शिक्षक यांच्याकडे मुख्याध्यापकाचा पदभार असून तेही सध्या अर्जित रजेवर आहेत.अश्या स्थितीत तिसऱ्या शिक्षिका ह्या शाळेत कार्यरत असून १ ते ७ या वर्गांना अध्यापन करत आहे. एक शिक्षक आणि वर्ग ७ अशी दुरावस्था शाळेची झालेली असून बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावला जातो आहे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासनाने नुकत्याच केलेल्या शिक्षक भरती मध्ये सुद्धा शाळेला शिक्षक मिळाला नाही तत्पूर्वी आणि गेल्या मागील वर्षभरापासून संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज निवेदन देत आहोत वारंवार विनंत्या करत आहोत परंतु अद्यापही शाळेला शिक्षक मिळत नाही त्यामुळे दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी चिकणी येथील सरपंच अमोल आखूड व गावातील सामाजिक कार्यकर्ता भाविक आखूड आणि शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांतर्फे वर्धा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांना निवेदन देण्यात आले. ७ दिवसांमध्ये जर शाळेला शिक्षक मिळाला नाही तर शाळेला टाळेबंदी आंदोलनाचा इशारा यावेळी गावकऱ्यांच्या वतीने शासनाला देण्यात आला.तेव्हा साहेबांनी स्वतः या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून शिक्षक देऊ अशी ग्वाही दिली. आमच्या मुलांना शिकण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे तेव्हा शासनाने आमच्या मुलांकडे दुर्लक्ष करू नये हेच गावकऱ्यांची शासनाकडे मागणी निवेदनातून मागणी केली आहे.