शेतकऱ्यांची गैरसोय; आष्टीच्या कृषी कार्यालयातील कर्मचारी अनुशेष त्वरित दूर करा,भाजपची मागणी…

0

आष्टी(शहीद) -/ आष्टी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यकांपासून तर कृषी अधिकाऱ्यापर्यंतची महत्त्वपूर्ण पदे एक दोन नव्हे तब्बल आठ ते दहा वर्षापासून रिक्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे कर्मचाऱ्यांचा हा अनुशेष त्वरित दूर करण्याबाबत भाजपच्या वतीने शुक्रवार दि. १२ ला विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी वर्धा तथा जिल्हा कृषी अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.भाजपचे जिल्हा महामंत्री अशोक विजयकर, किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कापसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आष्टी येथील तालुका कृषी अधिकारी पद, कृषी अधिकारीपद,कृषी पर्यवेक्षक यासारखी महत्त्वपूर्ण पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असून बाहेरील अधिकाऱ्याला अतिरिक्त प्रभार देऊन कामकाज रेटले जात आहे.येथे १२ कृषी सहाय्यकांची पदस्थापना असताना केवळ चार ते पाच कृषी सहाय्यकांकरवी तालुक्यातील 135 गाव- मौज्यांचा कारभार चालविला जात आहे.सन २०२१-२२ चा अपवाद वगळता अनेक वर्षापासून ही स्थिती कायम आहे. अलीकडच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी हिताच्या अनेक योजना सुरू केल्या असून तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचे सुयोग्य संचालन होण्याकरिता आवश्यक कर्मचारीच येथे नसल्याने या योजनांचा आष्टी तालुक्यात बोजवारा वाजत आहे. तसेच गेल्या काही वर्षात पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती पिकांना फटका बसतो कधी अतिवृष्टी झाल्याने हाती आलेले पीक हातचे निघून जाते तर वातावरणातील बदलामुळे पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात कमालीची घट येते. आष्टी तालुक्यात फळबागा मोठ्या प्रमाणात असून वादळी पावसाने फळबागांचेही प्रचंड नुकसान होते. अशा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पिक पाहणी करण्याकरता आवश्यक कर्मचारीच या कार्यालयात नसल्याने तालुक्यातील शेतकरी शासकीय मदतीपासूनही वंचित राहत आलेला आहे. या बाबीची आता तरी गांभीर्यपूर्वक दखल घेऊन या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अनुशेष त्वरित भरून काढावा अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषिमंत्री धनंजयजी मुंडे, पालकमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. कृषी सहायकांची कमतरता लवकरच भरून काढू असा विश्वास जिल्हाधिकारी कार्डीले यांनी दिला आहे.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!