शेती क्षेत्रावरील युध्दाच्या परिणामांची निती स्पष्ट करा,शेतकरी नेते सिकंदर शहा यांची मागणी….

0

🔥शेती क्षेत्रावरील युध्दाच्या परिणामांची निती स्पष्ट करा,शेतकरी नेते सिकंदर शहा यांची मागणी.

यवतमाळ -/ भारतात खरीप हंगाम लवकरच सुरु होणार असून युध्दामुळे खताची प्रचंड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील खरीप हा सर्वात मोठा हंगाम असल्यामुळे शेतकरी कोट्यवधी रुपये आपल्या शेतीत गुंतवणार आहे. दरम्यान युध्दजन्य परिस्थितीमुळे देशातील शेतीवर संकट येण्याची शक्यता असून केन्द्र सरकारने शेती क्षेत्रावरील युध्दाच्या परिणामांची निती स्पष्ट करण्याची मागणी शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.

सिकंदर शहा यांनी म्हटले आहे की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम डिझेल-पेट्रोलच्या उपलब्धतेवर आणि दरांवर होण्याची शक्यता आहे. शेतीतील नांगरणी, वखरणी आणि पेरणीसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. याशिवाय खतांच्या संभाव्य तुटवड्याबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. वास्तव पाहता, भारतात वापरल्या जाणाऱ्या अनेक रासायनिक खतांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या कच्च्या मालावर अवलंबून आहे. विशेषतः सल्फर (गंधक) हा घटक महत्त्वाचा असून तो प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून किंवा नैसर्गिक वायूपासून मिळतो. भारत मोठ्या प्रमाणावर सल्फर आणि फॉस्फेटिक कच्चा माल मध्यपूर्व देशांकडून आयात करतो. सल्फरचा वापर सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) आणि इतर फॉस्फेटिक खतांच्या निर्मितीत होतो. सल्फरचा पुरवठा खंडित झाला किंवा महागला, तर खत उत्पादनावर थेट परिणाम होतो. याचप्रमाणे युरिया निर्मितीसाठी नैसर्गिक वायू आवश्यक असतो, तो देखील मोठ्या प्रमाणावर आयात केला जातो. युध्दामुळे शेतीवर गंभीर संकट येणार असल्याने केन्द्र सरकारने आपली निती स्पष्ट करीत शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे.

🔥स्पष्ट भूमिका जाहिर करा.

खरीप हंगामात वेळेवर खते मिळाली नाहीत तर उत्पादन घटण्याबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पुढाकार घेत खतांचा साठा, आयात नियोजन आणि वितरण व्यवस्था याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून शेतकऱ्यांना आश्वस्त करावे, अशी मागणी सिकंदर शहा यांनी केली आहे.

       ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!