वर्धा /साहित्याचे मूळ हे मानवी मूल्ये प्रस्थापित करुन समस्त सृष्टीतील जीवन सुखी आणि समाधानी करण्याचे आहे.हे सुख समाधान पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरणाचेही आहे.या पृथ्वीचा उकीरडा व्हायचा नसेल तर सबंध साहित्यिकांनी आपली लेखणी सरसावत वर्तमानात मूल्यभावाचे साहित्य जाणीवपूर्वक लिहिले पाहिजे. असे साहित्य प्रकाशित केले पाहिजे आणि वाचकांपर्यंत पोचता केले पाहिजे असे प्रतिपादन पथदर्शी साहित्य संघ विदर्भ प्रांत द्वारा आयोजित “साहित्य लेखन कार्यशाळा” जगजिवनराम माध्यमिक विद्यालय, रामनगर, वर्धा येथील आयोजनात केले.प्रथम सत्रात प्रा. विलास भवरे, पुसद यांनी आपले अनुभव, लेखन शैली, लेखनाचे प्रकार, लेखणाचे टप्पे यावर आपली मते मांडली. त्यांचा सत्कार पथदर्शीचे पदाधिकारी डॉ. अरविंद पाटील, प्रकाश जिंदे, प्रशांत ढोले, जगदीश भगत यांनी केला.आभार सुषमा पाखरे यांनी केले.दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. सिद्दार्थ भगत, राळेगाव यांनी कविता, गझल, अलंकार, अलंकार प्रकार, उपमा, अक्षरगण वृत याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले आणि विद्यार्थी यांचे कडून कविता, गझल तयार करून घेतली.कार्यशाळेत एकूण साठ विद्यार्थी, कवी, शिक्षक, समिक्षक सहभागी झाले होते. भरघोस असा प्रतिसाद विद्यार्थी यांनी दिला. समारोपीय सत्रात डॉ. सिद्धार्थ भगत यांचा सत्कार धम्मा कांबळे यांचे हस्ते करण्यात आला.मराठी साहित्य लेखन कार्यशाळेत वर्धा, यवतमाळ, राळेगाव, नागपूर, पुलगाव, आर्वी, आष्टी, देवळी येथील विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर सहभागी झाले होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जगदीश भगत, संजय मोडक, सुषमा पाखरे, प्रकाश जिंदे, प्रकाश कांबळे, उमेश गायकवाड, अतुल सोनवणे, लक्ष्मीनारायण सोनवणे यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.