🔥सुकळी(बाई) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दरोडा; खिडकी फोडून चोरट्यांचा प्रवेश.
वर्धा -/वर्धा–आर्वी मार्गावरील सुकळी(बाई) येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूस असलेली खिडकी तोडून आत प्रवेश केला. आज सकाळी बँक कर्मचारी शाखेत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सदर घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बँकेमध्ये तोडफोड केल्याचे स्पष्ट दिसून येत असून पंचनामा सुरू आहे. पंचनामा पूर्ण झाल्यानंतरच बँकेला नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, हे स्पष्ट होणार आहे.
विशेष म्हणजे, याच बँक ऑफ इंडियाच्या शाखेत यापूर्वीही चोरीची घटना घडली होती. त्या वेळी चोरट्यांनी बँकेची भिंत फोडून आत प्रवेश केला होता. यावेळी मात्र मागील बाजूची खिडकी फोडून चोरट्यांनी दरोडा टाकल्याने बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटना उघडकीस येताच परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सावंगी पोलीस अधिक तपास करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह चोरट्यांचा शोध सुरू आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.