सेलू -/ येथील नगरपंचायतच्या ताफ्यात आज आगीवर नियंत्रण मिळविणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनाची एन्ट्री झाली. याप्रसंगी नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या वाहनाची विधीवत पूजा करण्यात आली.सेलू येथील ग्रामपंचायतीचा सन २०१५ मध्ये नगरपंचायत मध्ये समावेश करण्यात आला. नगरपंचायतमध्ये समावेश झाल्यानंतरही आवश्यक त्या सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध नव्हत्या. शहरात एखादी आगसदॄश्य घटना घडली तर वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या वाहनाची वाट पाहावी लागायची, परंतु आता सेलूकरांच्या सेवेत नगरपंचायतची अग्निशमन आणीबाणी सेवा कार्यान्वित करण्यात आली असून नुकतेच अग्निशमन दलाच्या वाहनाची शहरात एन्ट्री झाली. यावेळी नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, गटनेता तथा पाणी पुरवठा सभापती शैलेंद्र दफ्तरी, नगरसेवक संदीप सांगोळकर, किशोर इरपाते, राजेंद्र मिश्रा यांच्या उपस्थितीत अग्निशमन दलाच्या वाहनाची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी नगरपंचायतचे कर्मचारी देखील प्रामुख्याने उपस्थित होते.