🔥सोनल शर्मा जागतिक मंचावर भारतीय शैक्षणिक नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणार.
🔥यूके लीडरशिप डेलिगेशन 2026 साठी निवड
यवतमाळ -/ स्वर्गीय श्री. कैलाश शर्मा (वेलकम हॉटेल वाले) यांची कन्या तसेच बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. सोनल शर्मा यांची यूके लीडरशिप डेलिगेशन 2026 साठी निवड करण्यात आली आहे. हा मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रम लंडन (युनायटेड किंगडम) येथे आयोजित करण्यात आला आहे.सौ. सोनल शर्मा या 18 जानेवारी 2026 रोजी या कार्यक्रमासाठी प्रस्थान करणार असून, त्या जागतिक स्तरावर भारत तसेच भारतीय शैक्षणिक नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या प्रतिनिधि मंडळामध्ये वरिष्ठ शैक्षणिक नेतृत्वकर्त्यांचा समावेश असून, ते ब्रिटिश शाळांना भेटी देतील, नेतृत्वविषयक संवादात सहभागी होतील तसेच BETT लंडन या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदर्शनात जागतिक शिक्षण, प्रशासन, नेतृत्व धोरणे आणि नवोन्मेषाशी संबंधित सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करतील.ही निवड जागतिक मंचावर भारतीय शैक्षणिक नेतृत्वाच्या प्रतिनिधित्वाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण यश असून, भारताच्या प्रगत शिक्षण प्रणाली व सशक्त नेतृत्व क्षमतेचे प्रतीक आहे.ही संधी भारत व ब्रिटनमधील शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यास उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्रातील यवतमाळसारख्या छोट्या शहरातून सौ. सोनल कैलाश शर्मा यांना लंडनमध्ये जागतिक स्तरावर भारतीय शिक्षण प्रणालीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.