हिंगणघाट -/रात्री पेट्रोलिंगदरम्यान शहराच्या एफ. बी. टाऊन परिसरात पोलिसांना मिळून आलेली १ लाख ७५ हजार रोख रकमेची बँग पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला परत करण्याची सौहार्दता दाखवली असून सर्वत्र पोलीस विभागाचे कौतुक होत आहे.
पोलीस विभागाबद्दल जनतेला विविध अनुभवांना सामोरे जावे
लागते. त्यातल्या त्यात चांगल्या अनुभवापेक्षा वाईट अनुभवांचेच चर्वितचर्वन सर्वसामान्यांमध्ये होते. परंतु एखाद्या घटनेतून पोलिसांचा प्रामाणिकपणा समोर येतो व तो जनतेपुढे अधोरेखीत होऊन जनतेच्या हृदयात कायमचे कोरले जाते. असेच काही हिंगणघाटच्या एफ. बी. टाऊनमध्ये घडले. ५ मार्च रोजी पोलीस रात्रीला
पेट्रोलिंगवर असताना रस्त्याच्या बाजूला झाडाच्या आडोशामध्ये दोन रेगझिन बॅग संशयास्पद दिसून आल्या. कोणत्यातरी चोराने चोरी करून पोलिसांची गाडी पाहून सदर बॅगा त्या ठिकाणी सोडून पळ काढला असावा, असा कयास आहे. पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस हवालदार नरेंद्र डहाके, आकाश कांबळे व चालक रवी पांडे यांना सदर बॅग निदर्शनास येताच त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये चक्क १ लाख ७५ हजार रुपये रोख व चांदीचा शिक्का दिसला. त्यावरून कुठेतरी चोरी झाली असावी, असा पोलिसांना संशय बळवल्याने त्यांनी नक्की प्रकरण काय आहे, याचा शोध घेण्याकरिता बॅगची बारकाईने पाहणी केली असता त्यात मिळालेल्या बँकेच्या पासबुकवरील मोबाइल नंबरवरून संपर्क केला. त्यावेळी सदर बँग
ही दापोरी (ता. देवळी) येथील रहिवासी त्र्यंबकराव कामनापुरे यांची असल्याची खात्री पटली. त्यावरून पोलिसांनी आजूबाजूच्या रहिवासी लोकांना उठवून विचारपूस केली तेव्हा वृद्ध कामनापुरे दाम्पत्य बाहेर आले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता वृद्ध दाम्पत्य दापोरी, देवळी येथून हिंगणघाट येथे परत आले व अनावधानाने बॅग रोडवर झाडाच्या आडोशाला राहून गेली, असे सांगितले, पोलिसांनी १ लाख ७५ हजारांची भरलेली बॅग व चांदीचा शिक्का वृद्ध दाम्पत्यास
परत केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले व साक्षात त्यांच्या मदतीला देवरुपी पोलीस धावून आलेत, अशी भावना व्यक्त केली.
पोलिसांच्या सौहार्दतेचे सर्वत्र कौतुक त्र्यंबकराव कामनापुरे यांचा मुलगा एफ. बी. टाउनमध्ये राहतो. त्यांच्या वडिलांचे येथे जाणे-येणे असते. वृद्ध कामनापुरे दाम्पत्य देवळीवरुन आले व घराबाहेरच बॅग विसरले. सुदैवाने कुण्या चोरट्याला ती बंग दृष्टीक्षेपात न पडता पोलिसांना दिसून आली व महत्वाचे म्हणजे पोलिसांनी आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय देत तत्परतेने बंग मालकाला हुडकुन काढत ती त्यांच्या सुपूर्द केली. पोलिसांच्या या प्रामाणिकपणाबद्दल हिंगणघाट परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.