हिंगणघाट -/ बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचारा विरोधात आज हिंगणघाट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. बांगलादेशात आतापर्यंत सरकारविरोधी आंदोलनात २७ जागी हिंदूंना लक्ष करण्यात आले आहे. अनेक हिंदूंची संपत्ती लुटून त्यांचे घरे पेटवून देण्यात आली आहे.त्यामुळे अनेक हिंदू निर्वाचित झाले आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या हत्या झाल्या आहेत. हिंदू मंदिरांची तोडफोड करून त्याला आगी लावण्यात आल्या आहेत.अनेक स्त्रियांवर अत्याचार करून त्यांची हत्या करणे, बलात्कार करणे आदी घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू भयभीत झालेले आहेत. भारत सरकारने हस्तक्षेप करून हिंदू समाज व मंदिरांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावी. तसेच हिंगणघाट शहरात बेकायदेशीर रित्या वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी मुसलमान व रोहिंग्यांची हकालपट्टी करण्यात यावी.आदी मागण्यांकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने सदर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात विविध राजकीय संघटना,सामाजिक संघटना , शैक्षणिक संघटना , मोठ्या संख्येने पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या. दुपारी ठीक १२ वाजता स्थानिक कारंजा चौकातून भगवे ध्वज हाती घेतलेले व बांगलादेशाचा निषेध असलेले फलक हाती घेऊन , बांगलादेश विरोधात घोषणा देत आक्रोश मोर्चात निषेध नोंदविण्यात आला. शहरातील सुभाष चौक ,विठोबा चौक, आंबेडकर चौक मार्गे मार्गक्रमण करीत हिंगणघाट विभागीय अधिकारी कार्यालयात मोर्चा पोहोचला .यावेळी तहसीलदारांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले. तहसीलदारांशी चर्चा करून हिंगणघाट येथील सकल हिंदू समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली, तसेच हिंगणघाट शहरात सर्वेक्षण करून बेकायदेशीर रित्या राहत असलेल्या बांगलादेशी मुसलमान व रोहिग्याना हुडकून काढून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.