🔥५० हजारांची लाच घेताना महसुल सहाय्यक आणि लिपीकाला रंगेहात बेड्या!
यवतमाळ -/ भ्रष्टाचाराने पोखरलेल्या यवतमाळच्या महसूल विभागात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठा ‘धडाका’ उडवून दिला आहे. शेतजमिनीच्या वर्गवारीचा निकाल लावून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि तडजोडीअंती ५० हजार रुपये स्वीकारणाऱ्या महसूल सहायक आणि वरिष्ठ लिपिकाला एसीबीने अत्यंत धाडसी सापळा रचून रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांत बसून सर्वसामान्यांचे रक्त शोषण करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
आज दिनांक १३ मार्च २०२६ रोजी यवतमाळमधील स्टेट बँक चौकातील ‘फ्रेंड्स बार’ येथे ही थरारक कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोपाल महादेवराव मोहाडे (वय ४४, महसूल सहायक, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ) आणि राहुल अरुणराव कुयटे (वय ३८, वरिष्ठ लिपिक, तहसील कार्यालय, पांढरकवडा) अशी आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराने मौजा मेंढला (ता. कळंब) येथील एका शेतजमिनीचे सौदेपत्र तयार केले होते. ही जमीन ‘भोगवटादार वर्ग २’ मधून ‘भोगवटादार वर्ग १’ मध्ये रूपांतरित करण्यासाठी तक्रारदाराने जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे अर्ज केला होता. या कामासाठी तक्रारदार सातत्याने पाठपुरावा करत होते.
या कामासाठी आरोपी गोपाल मोहाडे याने तक्रारदाराकडे चक्क ७५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम त्याचे जुने सहकारी राहुल कुयटे यांच्याकडे देण्यास सांगितले. भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळलेल्या तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
एसीबीने या तक्रारीची अत्यंत गोपनीयरीत्या पडताळणी केली. ६ मार्च ते १३ मार्च २०२६ दरम्यान विविध टप्प्यांवर करण्यात आलेल्या पडताळणीत असे निष्पन्न झाले की, आरोपींनी लाचेची मागणी केली असून तडजोडीअंती ५०,००० रुपये घेण्याचे मान्य केले आहे.
आज दुपारी २:०२ ते ३:५८ च्या दरम्यान, यवतमाळमधील प्रसिद्ध फ्रेंड्स बार येथे सापळा रचण्यात आला. राहुल कुयटे याने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून रंगेहात पकडले. महसूल विभागातील दोन महत्त्वाच्या पदांवर असलेल्या या लोकसेवकांनी आपली पदे आणि अधिकारांचा वापर जनतेची लूट करण्यासाठी केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बसून लोकांच्या कामांचा निपटारा करण्याऐवजी, तिथे भ्रष्टाचाराची दुकाने उघडली गेल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. शेतकरी आधीच संकटात असताना, त्यांच्या जमिनीच्या हक्काच्या कामासाठी ७५-७५ हजार रुपये मागणाऱ्या या ‘पांढरपेशी’ लाचखोरांविरुद्ध समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एसीबीने घेतलेली ही आक्रमक भूमिका पाहून यवतमाळमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई म्हणजे भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने दिलेला एक स्पष्ट इशारा मानला जात आहे. ही धडक कारवाई बापू बांगर (पोलीस अधीक्षक, एसीबी अमरावती) आणि सचिन शिंदे (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वी केली अभय आप्टेकर (पोलीस उपअधीक्षक, एसीबी यवतमाळ पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट आणि त्यांचे सहकारी जयंत ब्राम्हणकर, अब्दुल वसीम, संजय भुजाडे, सचिन भोयर, ईफराज काझी, भागवत पाटील, आकाश सहारे आणि मनीषा राजूरकर यांनी केली.