🔥हिंगणघाट तहसीलदारांच्या नाकाखाली ‘मौत का सौदा’ सावंगी रिठ घाटात हीच ती अवैध रेती उपशाने ११ गावांचे आरोग्य धोक्यात!
🔥हाच तो बघा व्हिडीओ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बोट मशीन्सवर अद्याप जप्तीची कारवाई का झाली नाही?
हिंगणघाट -/ सत्ता आणि पैशाच्या जोरावर प्रशासनाला खिशात घालून फिरणाऱ्या रेती माफियांनी आता सामान्यांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. हिंगणघाट तालुक्यातील सावंगी रिठ रेती घाटावर सध्या सुरू असलेला धुमाकूळ हा केवळ अवैध रेती उपसा नसून, ११ गावांतील जनतेला विष पाजण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाला हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे आणि उपविभागीय अधिकारी (SDM) अवतारे यांचे मूक संमतीने पाठबळ असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. सावंगी रिठ घाटाची स्थिती आज अत्यंत विदारक झाली आहे. सावंगी रिठ घाट मालक इंद्रजित सराफ हा शिदे सेना गटाचा पदाधिकारी राजेश सराफ यांचा मुलगा असल्याने आजनसरा या पवित्र तीर्थक्षेत्राला लागून असलेल्या या घाटात नियमांची पायमल्ली करत नदीपात्रात यांत्रिक बोट मशीन्स आणि पोकलेन उतरवण्यात आले आहेत. नियमानुसार नदीपात्रात अशा यंत्रांना बंदी असतानाही, येथे राजरोसपणे नदीचे काळीज फाडले जात आहे.
या यंत्रांमधून गळणारे ऑइल आणि इंधन थेट नदीच्या पाण्यात मिसळत आहे. याच घाटाच्या परिसरातून अल्लीपूर, पवनी, सोनेगाव, शिरजगाव, निधा, टाकळी, माणसावली, कानोली, कात्री आणि काचनगाव अशा ११ गावांची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. फिल्टर प्लांट असूनही, पाण्यात मिसळलेल्या रासायनिक ऑइलमुळे हे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रशासनाच्या या डोळेझाक वृत्तीमुळे हजारो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व अवैध कारभाराचा मुख्य सूत्रधार इंद्रजित सराफ असल्याचे बोलले जात आहे. राजेश सराफ हे सत्ताधारी शिंदे गटाचे वर्धा जिल्हा प्रमुख असल्याचे सांगत परिसरात दहशत निर्माण करत आहेत. “माझा राजकीय हात वर आहे, कोणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही,” अशा शब्दांत ते तक्रार करणाऱ्या नागरिकांना धमकावत असल्याचे बोलुन दाखवत आहे.
परंतु, प्रश्न असा पडतो की, राजकीय दबाव असला तरी तहसीलदार योगेश शिंदे आणि SDM अवतारे यांचे कर्तव्य नेमके काय? नदीपात्रात पोकलेन चालताना त्यांना दिसत नाहीत का? की या अवैध रेती उपशाच्या ‘मलाई’ मध्ये या अधिकाऱ्यांचेही हात ओले झाले आहेत? जनतेने वारंवार तक्रारी करूनही हे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे.
ज्या नदीतून ११ गावे आपली तहान भागवतात, त्या नदीला खड्ड्यांचे साम्राज्य बनवण्यात आले आहे. खोल खड्ड्यांमुळे भूजल पातळी खालावली असून भविष्यात या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ऑइल मिश्रित पाण्यामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. तरीही, हिंगणघाट प्रशासन ‘लाज’ गहाण ठेवून झोपी गेल्याचे सोंग घेत आहे का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
प्रशासकीय अधिकारी जर पैशांच्या हव्यासापोटी जनतेचा बळी देत असतील, तर आता जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागेल. जर येत्या २४ तासांत सावंगी रिठ घाटावरील बोट मशीन्स जप्त करून, इंद्रजित सराफ यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर ११ गावांतील नागरिक तहसील कार्यालयावर धडक देणार असल्याचे समजते.
आमचे सवाल: १. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बोट मशीन्सवर अद्याप जप्तीची कारवाई का झाली नाही? २. ११ गावांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घाट मालकाला अभय कोणाचे? ३. तहसीलदार आणि SDM यांनी या घाटाचा पंचनामा कधी केला? आणि नसेल केला तर का?
आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून अवैध धंदे करणाऱ्या या माफियांच्या मुसक्या आवळल्या जातात की हिंगणघाटचे प्रशासन असेच ‘आंधळे’ बनून राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)