महसूल मंत्र्यांचे ‘वरदहस्त’ अन् अडेगावच्या खाणीत नियमांचा ‘चुराडा’!

0

🔥महसूल मंत्र्यांचे ‘वरदहस्त’अन् अडेगावच्या खाणीत नियमांचा ‘चुराडा’!

यवतमाळ -/ राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे एकीकडे शासनाचा महसूल वाढवण्यासाठी दररोज नवनवीन कडक आदेश काढत असताना, दुसरीकडे त्यांच्याच मर्जीतील लोकांसाठी नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. झरी जामणी तालुक्यातील अडेगाव येथील ‘इंशात मिनरल्स’ या चुनखडी आणि डोलामाईट खाणीच्या मालकाशी असलेल्या कथित साटेलोटामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, याकडे जिल्हा प्रशासनाने सोयीस्कररीत्या डोळेझाक केली आहे.
​​नागपूरस्थित उद्योजक अरिहंत अग्रवाल यांच्या मालकीची ही खाण गेल्या २५ वर्षांपासून अडेगाव परिसरात सुरू आहे. नियमानुसार कोणत्याही खाणकामासाठी ठराविक कालावधीनंतर परवान्यांचे नूतनीकरण, पर्यावरणीय परवानग्या आणि उत्खनन मर्यादेचे पालन करणे अनिवार्य असते. मात्र, इंशात मिनरल्सच्या बाबतीत सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वणी येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयात या खाणीशी संबंधित अधिकृत कागदपत्रेच उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळे या खाणीची मुदत संपली आहे की ही खाण पूर्णपणे अवैध आहे, असा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ​दोन दिवसांपूर्वी वणी येथे वेकोलीच्या मुंगोली खाणीसंदर्भात जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीसाठी खुद्द जिल्हाधिकारी विकास मीना उपस्थित होते. जनसुनावणी संपल्यानंतर अडेगाव येथील वादग्रस्त खाणीची पाहणी करणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित होते. मात्र, गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या खाणीकडे पाठ फिरवली. प्रशासकीय प्रमुखांनीच अशा प्रकारे दुर्लक्ष केल्याने, “वरिष्ठांच्या दबावापोटी ही कारवाई टाळली जात आहे का?” अशी चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे.
​​महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे हे नेहमीच पारदर्शक कारभाराचा दावा करतात. मात्र, अरिहंत अग्रवाल यांच्यासाठी महसूल विभागाचे नियम शिथिल केले गेले आहेत का, असा प्रश्न अडेगावचा नागरिक विचारत आहे.
​ईटीएस (ETS) मोजणीचा पत्ता नाही: इतकी वर्षे लुटालूट सुरू असूनही या खाणीची साधी ईटीएस मोजणी करण्यात आलेली नाही. खनिकर्म विभागाला आजवर कोणताही अधिकृत अहवाल सादर न केल्यामुळे प्रत्यक्षात किती उत्खनन झाले आणि शासनाचा किती महसूल चोरीला गेला, याचा आकडा अद्याप गुलदस्त्यात आहे.
​दिवसाढवळ्या लूट: कोट्यवधी रुपयांची मौल्यवान खनिजे दररोज ट्रकच्या माध्यमातून चोरून नेली जात आहेत, तरीही स्थानिक तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि खनिकर्म विभाग ‘ब्र’ काढायला तयार नाही.
​​”गावाचा विकास करू, बेरोजगारांना रोजगार देऊ” अशा भुलथापा देऊन अग्रवाल यांनी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता जमिनी हातातून गेल्यावर विकासाच्या नावाखाली केवळ धूळ आणि प्रदूषण गावकऱ्यांच्या पदरी पडले आहे.
​सर्वात गंभीर बाब म्हणजे, जेव्हा नागरिक या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, तेव्हा अरिहंत अग्रवाल यांचे गावगुंड ग्रामस्थांना धमकावण्याचे काम करत आहेत. “मंत्री आमचे आहेत, प्रशासन खिशात आहे,” अशा अविर्भावात वागणाऱ्या या गुंडांमुळे अडेगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
​प्रशासनाला काही प्रश्न:
१. उपविभागीय कार्यालयात या खाणीची कागदपत्रे का उपलब्ध नाहीत?
२. इतकी वर्षे ईटीएस मोजणी न होण्यामागे कोणाचा आशीर्वाद आहे?
३. खनिकर्म विभाग आणि तहसीलदार या चोरीवर गप्प का आहेत?
४. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देण्याचे का टाळले?
​अडेगावची ही खाण केवळ पर्यावरणाचा ऱ्हास करत नसून, ती भ्रष्टाचाराचे एक मोठे केंद्र बनली आहे. जर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून या खाणीवर कारवाई केली नाही, तर आगामी काळात जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!