शेषराव जिनिंग मालमत्ता विक्री प्रकरणात शासनाला कोट्यवधींचा चुना…

0

🔥शेषराव जिनिंग मालमत्ता विक्री प्रकरणात शासनाला कोट्यवधींचा चुना.

🔥जिल्हा विशेष लेखापरीक्षकाकडे सखोल चौकशीची मागणी.

यवतमाळ -/ जिल्ह्यातील पुसद येथील कै. शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी सोसायटी म. पुसद यांच्या स्थावर मालमत्ता विक्री प्रकरणात शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर अमोल ओमप्रकाश कोमावार यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून तात्काळ सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुध्दा हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करुन चौकशीची मागणी केली होती.

मुद्रांक शुल्क वसुलीसाठी शासनाचे मुल्यदर हे वेगवेगळे आहे. खुली जमिन 8 हजार प्रति चौरस मिटर, निवासी सदनिकासाठी 25 हजार, कार्यालयासाठी 28 हजार 700 दुकानासाठी 31 हजार असे दर नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पुसद येथील शेषराव जिनींगची मालमत्ता 4 हेक्टर 5 आर (दहा एकर) म्हणजेच 40 हजार 500 चौरस मिटर ही मालमत्ता खुली जमिनीचे दर लावल्यास 32 कोटीची होते. खरेदी मध्ये ही रक्कम 35 कोटी दाखविण्यात आली आहे. वास्तविक जिनींगची जागा आता शहराच्या मध्यभागी असल्याने निवास/सदनिकेच्या दराने गणना करणे आवश्यक होते असे सदर प्रकरणाची चौकशी करणारे कैलास खटारे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, घाटंजी तथा प्राधिकृत चौकशी अधिकारी (कलम 83) कै.शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्था मर्या. पुसद यांचे म्हणने आहे. या चौकशी अधिका-यांचे मते निवास/सदनिकेच्या दराने गणना केल्यास या मालमत्तेची किंमत 100 कोटी रुपये होते. विशेष म्हणजे ही बाब कैलास खटारे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत नमूद केली आहे. चौकशी अधिका-याने आपल्या मतानुसार अहवाल तयार करावा याकरिता त्यांच्या घरी जाऊन अमोल येरावार यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत ऑनलाईन तसेच जिल्हा पोलिस अधिक्षकांना तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी सदर मालमत्तेच्या विक्रीवेळी बाजारमुल्य सन 2020 नुसार काढण्यात आले आणि विक्री मात्र सन 2022 मध्ये करण्यात आल्याचे तसेच नुसत्याच जमिनीचा नव्हे तर त्यावर असलेल्या मशिनरीज आणि इतर मालमत्तेचा उल्लेख केल्यास हीच किंमत शंभर कोटीपेक्षाही जास्त असल्याचा दावा करीत चौकशीची मागणी केली आहे. सदर प्रकरणात ऑनलाईन ई-टेंडरिंग करण्यात आले नाही. शासनाच्या अटींनुसार स्थानिक भाषेतील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करण्यात आली नाही. पुसद येथील मदिना मशीद समितीने सदर जमीन वक्फ बोर्डाची असल्याचा दावा केल्यानंतरही मालमत्ता विक्री करण्यात आली. शेषराव जिनिंग संस्थेच्या संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात आलेली असून, मुदत संपलेल्या संचालक मंडळाने धोरणात्मक व महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या असतानाही हा व्यवहार करण्यात आला, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

🔥राजकिय नेत्यांचे संगनमत.

राजकीय संगनमत करुन कमी किंमत दाखवून शासनाला कोट्यवधीचा चुना लावण्यात आला. दुसरीकडे स्वताही कोट्यवधी रुपयांची कमाई करुन घेतली. आधी ही मालमत्ता नागपूर येथील आर.सी. प्लास्टो कंपणीने 35 कोटी रुपयांची घेतली त्यांनतर यांच्यापासून कपिष फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपणीने 37 कोटी 61 लाखमध्ये घेतली. यामध्ये यवतमाळचे अमोल येरावार भागीदार आहे. अहवाल आपल्या बाजुने असावा याकरिता चौकशी अधिका-यांना धमकी दिल्याची त्यांचेविरुध्द तक्रार आहे. संपूर्ण व्यवहाराची आयकर विभागामार्फतही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.

            ब्युरो रिपोर्ट                        साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!