🔥हेच ते तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या व ठाणेदार यांच्या आशीर्वादाने आर्णीत यमाची दिवसा ढवळ्या वाहतूक सुरू आहे.
यवतमाळ -/ एकीकडे सरकार महसूल वाढीच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे आर्णी आणि घाटंजी तालुक्यातील जंलाद्री वाळू घाटावर प्रशासकीय अधिकारी आणि तस्करांच्या अभद्र युतीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मूळ कंत्राटदाराने माघार घेतल्याचा फायदा घेत, आता तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्या ‘अर्थपूर्ण’ मूकसंमतीने घाटाचा परस्पर लिलाव उरकल्याची धक्कादायक चर्चा परिसरात आहे.रॉयल्टीची आता कोणालाच भीती उरली नसून, भरधाव वेगाने धावणारे हायवा आणि टिप्पर जणू आर्णीकरांच्या जीवावर उठले आहेत.
जंलाद्री घाटाचा अधिकृत लिलाव प्रक्रियेत पेच असताना, तिसऱ्याच एका इसमाने तहसीलदारांच्या मदतीने या घाटावर ताबा मिळवला आहे. “राॅयल्टी असली काय आणि नसली काय, आता फरक पडत नाही” अशा अविर्भावात ही लूट सुरू आहे.विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्यांनी या अवैध उपशावर लगाम घालणे अपेक्षित होते, तेच या ‘काळ्या’ कमाईत भागीदार असल्याचा संशय बळावला आहे. दिवसाढवळ्या आर्णी शहराच्या मुख्य रस्त्यावरून वाळूचे ट्रक सुसाट धावत असून, सामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत.
प्रशासकीय लाचारपणाचा कळस तर तेव्हा झाला, जेव्हा काही दिवसांपूर्वी आर्णी ठाणेदाराच्या शासकीय निवासस्थानाच्या (क्वार्टर) दुरुस्तीसाठी एक ब्रास वाळू चक्क तस्करांकडून उतरवून घेण्यात आली. विशेष म्हणजे, वाळू रिकामी करताच हायवा घेऊन चालक पसार झाला, पण पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.रक्षकच जेव्हा तस्करांच्या वाळूवर आपले घर सावरतात, तेव्हा कायद्याचा धाक उरणार कसा? हा प्रश्न आता जनता विचारत आहे.
जंलाद्री घाटावरून वाळू वाहून नेणारे टिप्पर, ट्रक आणि हायवा चालक हे बहुतांश वेळा दारूच्या नशेत धुंद असतात. रात्रभर वाळू चाळणीने गाळून उच्च दर्जाची वाळू उपसली जाते आणि पहाटेपासून ही वाहने आर्णीच्या रस्त्यांवर यमदूत बनून धावतात. तस्करांनी घाटावर अक्षरशः ठिय्या मांडला असून, तिथे आता कायद्याचे नाही तर केवळ ‘पैशाचे’ राज्य चालते.
जंलाद्री घाटातील या उच्च दर्जाच्या वाळूला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या मागणीचा फायदा घेत वाळू माफियांचे खिसे गरम होत असतानाच, पारवा ठाणेदाराचीही यात मोठी ‘चांदी’ होत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.चेकपोस्ट आणि गस्ती पथके असूनही ही अवैध वाहने कोणाच्या आशीर्वादाने सीमेबाहेर जातात? याचे उत्तर पारवा पोलिसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामध्ये दडलेले आहे.
वाळू तस्करांच्या या फोफावलेल्या धंद्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहेच, शिवाय पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. जंलाद्री घाटावर रात्रभर चालणारे हे ‘काळे कांड’ थांबवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनीच थेट हस्तक्षेप करण्याची गरज आहे. अन्यथा, तहसीलदार आणि ठाणेदारांच्या या संगनमताने आर्णी तालुका वाळू माफियांसाठी नंदनवन ठरेल, यात शंका नाही. तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांच्या मदतीने घाटाचा परस्पर ‘बोगस’ लिलाव.
ठाणेदाराच्या क्वार्टरसाठी मोफत वाळूचा पुरवठा; पोलिसांकडून तस्करांना अभय. दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या जिवाशी खेळ.
पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आर्थिक देवाणघेवाणीतून अवैध वाहतुकीला मोकळे रान.(क्रमशः)