रेमंडच्या कामगारांचा संयमाचा बांध फुटला! आझाद मैदानात एल्गार; २३ महिन्यांपासून वेतनवाढ रोखल्याने हजारो कामगार रस्त्यावर…..

0

🔥रेमंडच्या कामगारांचा संयमाचा बांध फुटला! आझाद मैदानात एल्गार;

🔥२३ महिन्यांपासून वेतनवाढ रोखल्याने हजारो कामगार रस्त्यावर

​यवतमाळ -/ जगाला ‘द कम्प्लीट मॅन’ची व्याख्या शिकवणाऱ्या रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्याच कामगारांना मात्र ‘अधुऱ्या’ अवस्थेत सोडले आहे. ‘ब्रँडेड कंपनी, पण कामगारांच्या नशिबी मात्र वणवण’ अशी विदारक स्थिती सध्या यवतमाळच्या रेमंड युको डेनिम प्रा. लि. मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या २३ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या प्रश्नावर अखेर कामगारांच्या संयमाचा बांध फुटला असून, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बाईक रॅली काढल्यानंतर आजपासून कामगारांनी आझाद मैदानात लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
​महागाईच्या वणव्यात कामगार होरपळला!
​मार्च २०२४ मध्येच रेमंडच्या कामगारांचा वेतनवाढीचा करार संपुष्टात आला होता. नियमानुसार एप्रिल २०२४ पासून नवीन करार लागू होऊन कामगारांच्या हातात वाढीव पगार मिळणे अपेक्षित होते. मात्र, व्यवस्थापनाच्या ‘ढिम्म’ धोरणामुळे तब्बल २३ महिने उलटूनही अद्याप करारावर स्वाक्षरी झालेली नाही. एकीकडे महागाई गगनाला भिडली असताना, दुसरीकडे हक्काची पगारवाढ रोखून धरल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
​​सुरुवातीला मान्यताप्राप्त संघटनेने ५,००० रुपयांच्या वेतनवाढीचा टप्प्याटप्प्याने प्रस्ताव दिला होता. मात्र, व्यवस्थापनाने दाखवलेली दिरंगाई आणि गेल्या दोन वर्षांत वाढलेली प्रचंड महागाई पाहता, आता कामगारांनी आपली मागणी अधिक आक्रमक केली आहे. “आता ५ हजार नाही, तर ७,२५० रुपयांचीच वेतनवाढ हवी!” या भूमिकेवर १,७८५ कामगार ठाम आहेत. ​मंगळवारी यवतमाळच्या रस्त्यांवर रेमंड कामगारांनी काढलेली भव्य बाईक रॅली ही व्यवस्थापनासाठी एक इशारा होता. त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस हालचाल न झाल्याने आज आझाद मैदानात शेकडो कामगार उपोषणाला बसले आहेत. “हा केवळ लढा पगाराचा नाही, तर आमच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा आहे,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ७,२५० रुपयांची वेतनवाढ एप्रिल २०२४ पासून नवीन करार लागू करून ही वाढ तातडीने देण्यात यावी. निलंबित कामगारांची वापसी ज्या कामगारांना निलंबित करण्यात आले आहे, त्यांना कोणत्याही अटीशिवाय पुन्हा कामावर घ्यावे.थकीत पगार संप काळातील कामगारांचा पूर्ण पगार त्वरित अदा करण्यात यावा.दिवाळी बोनस २०२३ आणि २०२४ च्या दिवाळी बोनसचा करार करून त्यात २०% वाढ करावी. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई कंपनीतील ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ही कोंडी निर्माण झाली आहे, त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी. ​रेमंड युको डेनिममधील तब्बल १,७८५ कामगार आणि त्यांची कुटुंबे सध्या उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करताना कामगारांची दमछाक होत आहे. जर व्यवस्थापनाने आपली आडमुठी भूमिका सोडली नाही आणि तातडीने तोडगा काढला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा कामगार नेत्यांनी दिला आहे.
​यवतमाळच्या या औद्योगिक शांततेला व्यवस्थापनाच्या दिरंगाईने सुरुंग लावला असून, आता सरकार आणि प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!