🔥लेखी आदेशाविना मनमानी कर वसुली? पोहना ग्रामपंचायतीतील प्रकाराने खळबळ.
वडनेर -/पोहना ग्रामपंचायतीत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक कार्यरत असताना, ग्रामपंचायत सचिवाने कोणताही लेखी आदेश किंवा अधिकृत ठराव नसताना स्थानिक नागरिकांची कमिटी स्थापन करून कर वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर तसेच इतर कारणांसाठी ग्रामपंचायत हद्दीत तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून कर वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, या वसुलीसाठी ग्रामपंचायतीच्या नावाने पावत्याही देण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, या वसुलीबाबत प्रशासकाचा कोणताही लेखी आदेश किंवा अधिकृत ठराव नसल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.
सध्या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सदस्य नसून संपूर्ण कारभार प्रशासकाकडे आहे. अशा परिस्थितीत कर आकारणी व वसुलीचा अधिकार केवळ प्रशासकालाच असतो. तरीही सचिवाने स्वतः पुढाकार घेत स्थानिक कमिटी स्थापन करून कर वसुली केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वसूल केलेली रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा झाली आहे का? संबंधित कमिटी कोणाच्या आदेशाने स्थापन झाली? कर आकारणीसंदर्भात अधिकृत लेखी आदेश अथवा ठराव आहे का? या प्रश्नांची अद्याप स्पष्ट उत्तरे मिळालेली नसल्याने संशय अधिकच बळावला आहे.
याप्रकरणी प्रशासकीय अधिकारी ईश्वर थुल यांनी स्पष्ट केले की, “महाशिवरात्री निमित्त पोहना येथे कोणत्याही व्यवसायाकडून किती रक्कम घ्यायची याबाबत मी तोंडी किंवा लेखी कोणताही आदेश दिलेला नाही. ग्रामपंचायत ठराव, सचिव आणि कमिटीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सचिवांशी संपर्क साधावा.”
दरम्यान, सचिवांकडे ठराव व आदेशाबाबत विचारणा केली असता “दरवर्षीप्रमाणेच वसुली करण्यात आली,” असे सांगण्यात आले; मात्र ठरावाची प्रत किंवा लेखी आदेश सादर करण्यात आले नाहीत.
महाशिवरात्री यात्रेदरम्यान पार्किंग, आनंद मेळा तसेच तात्पुरत्या व्यवसायांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि करपावती देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाची आवश्यकता आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.