🔥कोतेवाडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामावर निकृष्ट कामाचा आरोप; माजी सरपंच रवींद्र आष्टनकरांचा संताप.
हिंगणा -/कोतेवाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकामावर निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा गंभीर आरोप माजी सरपंच रविंद्रभाऊ आष्टनकर यांनी केला आहे. सदर इमारत बांधकाम काही महिन्यांपासून सुरू असले तरी अद्याप पूर्ण झालेले नसून झालेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आष्टनकर यांच्या म्हणण्यानुसार, बांधकामावर आवश्यक त्या प्रमाणात पाणी मारणे (क्युरिंग) काही दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सिमेंट-काँक्रीट योग्य प्रकारे सेट न होता भविष्यात इमारत कमकुवत होण्याचा धोका आहे. अशा निकृष्ट कामामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. फलकावरील माहितीनुसार, हे काम १५ वा वित्त आयोग सन २०२४-२५ अंतर्गत कोतेवाडा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारत बांधकामाचे असून अंदाजित खर्च सुमारे रुपये ४५ लाख आहे. या कामाचे शुभारंभ हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. समीरजी मेघे यांच्या हस्ते करण्यात आला होता. तसेच या प्रकल्पाशी संबंधित लोकप्रतिनिधींमध्ये सरपंच , उपसरपंच तसेच ग्रामपंचायत कोतेवाडा सदस्य व ग्रामस्थांचा उल्लेख फलकावर करण्यात आला आहे.
माजी सरपंच आष्टनकर यांनी संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून निकृष्ट दर्जाचे काम थांबवून गुणवत्तापूर्ण बांधकाम करावे, अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपकेंद्राच्या बांधकामात निष्काळजीपणा झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली.