🔥एक्साईजची ‘सर्जिकल स्ट्राईक’ की केवळ फार्स? १ कोटी ५ लाखांच्या बनावट दारू प्रकरणात मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाटच! 🔥जप्त देशी दारू ‘बनावट’ असल्याचा अधीक्षक शेंडे यांचा निर्वाळा…..पंधरवड्यानंतरही तपासाची गाडी ‘रिव्हर्स’ गियरमध्येच!
यवतमाळ -/ यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १२ फेब्रुवारी २०२५ च्या मध्यरात्री कळमनेर फाट्यावर हायव्होल्टेज ड्रामा करत १ कोटी ५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. सुरुवातीला या कारवाईचा मोठा गाजावाजा झाला, जणू काही विभागाने तस्करांचे कंबरडेच मोडले! मात्र, या ‘कथित’ सर्जिकल स्ट्राईकला आता १५ दिवस उलटूनही मुख्य आरोपींना अटक करण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे ही कारवाई तस्करांना धडा शिकवण्यासाठी होती की केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, असा संशयाचा धूर आता गडद झाला आहे.
🔥बनावट दारूचा ‘मौत का सौदा’ अन् प्रशासनाचे संशयास्पद मौन.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक खुलासा खुद्द अधीक्षक शेंडे यांनीच केला आहे. प्रयोगशाळा अहवालात जप्त केलेली देशी दारू पूर्णपणे ‘बनावट’ (नकली) असल्याचे सिद्ध झाले आहे. अंड्यांच्या कॅरेटच्या आड गोवा आणि मध्य प्रदेशातून आणलेल्या या दारूवर महाराष्ट्रातील नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे बनावट लेबल लावून तळीरामांच्या जीवाशी खेळ मांडला जात होता. ही केवळ दारूची तस्करी नाही, तर हा ‘मौत का सौदा’ आहे! बनावट दारूमुळे अंधत्व येणे किंवा सामूहिक मृत्यू होण्याच्या घटना ताज्या असतानाही, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात हे विषारी जाळे कोणाच्या छुप्या आशीर्वादाने पसरले आहे? इतक्या मोठ्या प्रमाणावर विषारी साठा पकडला जाऊनही तपास पथक सुस्त का? या प्रश्नांनी आता संपूर्ण जिल्ह्याला ग्रासले आहे.
या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून वर्ध्याचा कुख्यात तस्कर प्रशांत चंदनखेडे याचे नाव समोर आले आहे. मात्र, कारवाईनंतर १५ दिवस झाले तरी चंदनखेडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, या तपासाची मुख्य धुरा सांभाळणारे निरीक्षक बोद्यारे हे माध्यम प्रतिनिधींना भेटणे टाळत आहेत. ते कार्यालयात उपलब्ध नसणे किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करणे, यातून नेमका काय संदेश जातोय?
जप्त दारू नकली असल्याचा अहवाल हातात असूनही विभागाने ही माहिती सार्वजनिक करण्यास विलंब का केला? आरोपींपर्यंत पोहोचण्याऐवजी विभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र दिसत आहे. “वरदहस्त असल्याशिवाय तपास इतका संथ कसा असू शकतो?” असा जळजळीत सवाल आता सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा काय वाऱ्यावर आहेत? असा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, १० चाकी अवाढव्य कंटेनर, टाटा योद्धा आणि किया सेलटॉस सारखी महागडी वाहने आंतरराज्य सीमा ओलांडून विनासायास जिल्ह्यात शिरतातच कशी?
ज्या मार्गावरून ही वाहने आली, त्या मार्गावरील चेकपोस्टवर नेमकी कोणाची नियुक्ती होती, याची चौकशी का केली जात नाही? आरोपी अद्यापही मोकाट असल्याने, “विभागाचे तस्करांशी काही अर्थपूर्ण लागेबांधे तर नाहीत ना?” अशी चर्चा आता पानटपरीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रंगत आहे. कारवाई होऊन पंधरवडा उलटला, तरी ना बनावट दारू बनविणाऱ्या फॅक्टरीचा पत्ता लागला, ना ही खेप उतरविणाऱ्या महाराष्ट्रातील ‘मोठ्या माशांचा’ थांगपत्ता लागला. बनावट दारूची विक्री रोखण्यासाठी ठोस कृती करण्याऐवजी तपास यंत्रणा ‘रिव्हर्स’ गियरमध्ये का चालत आहे? जर या बनावट दारूमुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी झाली, तर त्याचे पाप कोणाच्या पदरात पडणार?
आता या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी स्वतः लक्ष घालण्याची वेळ आली आहे. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या तपास पथकाची झाडाझडती घेणार का? की हा तपास असाच ‘थंडा बस्ता’मध्ये टाकून आरोपींना अभय दिले जाणार?
यवतमाळकरांच्या नजरा आता वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे लागल्या आहेत. बनावट दारूचे हे आंतरराज्य रॅकेट मुळासकट उपटून काढले जाते की केवळ खालच्या स्तरावरील चालकांवर गुन्हे दाखल करून या प्रकरणावर पडदा टाकला जातो, हे लवकरच स्पष्ट होईल.(क्रमशः)