सुरगांव-रेहकी रस्त्यावर बिबट्याच्या शावकांची जोडी; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण…

0

🔥सुरगांव-रेहकी रस्त्यावर बिबट्याच्या शावकांची जोडी; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण.

सेलू – / सेलू ते येळाकेळी मार्गावरील सुरगांव व रेहकी दरम्यान काल रविवारी रात्री बिबट्याच्या दोन शावकांचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना दोन्ही शावक रस्ता ओलांडताना दिसल्याची माहिती मिळाली.

मौजा सुरगांव शिवारातील रस्त्यालगत असलेल्या किरण महल्ले यांच्या शेतातून आष्टेकर यांच्या शेताकडे जाताना ही शावकांची जोडी काही नागरिकांना दिसली. ही बाब लक्षात येताच संबंधित नागरिकांनी तात्काळ सुरगांव येथील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी वनविभागाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना अनावश्यक बाहेर न फिरता सतर्क राहण्याचे आवाहन केले.

मात्र, उशिरा रात्रीपर्यंत वनविभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सेलू येथील स्मशानभूमी परिसरातील बिबट्याचे मादी शावक भरदिवसा लगतच्या सोसायटीत आढळून आले होते. त्याला वनविभागाने रेस्क्यू करताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा शावकांच्या जोडीचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

      ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 सेलू वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!