🔥तक्रारीनंतरही कारवाई नाही; काँग्रेस नेते नगरसेवक जावेद परवेज अन्सारी यांनी उचलला मुद्दा.
यवतमाळ -/ यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील पारवा नजीक असलेल्या स्वरा फॉर्म हाऊस येथे अनेक वर्षांपासून जुगार, सट्टा आणि नशेचे अड्डे सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. स्थानिक माफिया म्हणून ओळखला जाणारा गब्बर पठाण हा हे अड्डे चालवत असल्याचा आरोप होत असून त्याला पोलिस अधिकाऱ्यांचे अभय असल्याचेही बोलले जात आहे.
स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात आल्या असतानाही या ठिकाणी अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे स्वरा फॉर्म हाऊस व्यतिरिक्त गब्बर पठाण जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी अशाच प्रकारचे जुगार व सट्ट्याचे अड्डे चालवत असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी काँग्रेसचे नेते व यवतमाळ नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद परवेज अन्सारी यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे व्हॉट्सअॅप व फोनद्वारे तक्रार नोंदवली आहे. तसेच या अड्ड्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र तक्रारीनंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याने या अवैध धंद्यांना पोलिसांचेच संरक्षण आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या ठिकाणी खुलेआम जुगार व सट्टा खेळला जात असल्याचे सांगितले जात असून महागडी दारू तसेच विविध प्रकारचे नशिले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा अवैध व्यवसाय निर्भयपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत असून अनेक युवक व विद्यार्थी जुगार आणि व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.तर दुसरीकडे यवतमाळ शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे.निवडणुकाकाळात यवतमाळ गुन्हेगारीमुक्त करण्याचे वचन स्थानिक नेत्यांनी दिले होते,त्यामुळे पोलिस प्रशासनासह स्थानिक जनप्रतिनिधीनीही या अशा गंभीर मुद्द्याकडे लक्ष देऊन आपल्यापरीने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत जावेद अन्सारी यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.
त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन गब्बर पठाण आणि त्याच्या अड्ड्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेते नगरसेवक जावेद परवेज अन्सारी यांनी केली आहे.(क्रमशः)