जसापूर तलावातून बांबरडा-बोरखेडी गावात गढूळ पाणीपुरवठा; lनागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

🔥जसापूर तलावातून बांबरडा-बोरखेडी गावात गढूळ पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

🔥ग्रामपंचायत अधिकारी बेपत्ता, संतप्त ग्रामस्थांची शुद्ध पाण्याची मागणी.

(आष्टी शहीद) नरेश भार्गव -/आष्टी तालुक्यातील आदिवासी बहुल व घनदाट जंगल परिसरातील बांबरडा आणि बोरखेडी या गावांमध्ये दि. २ मे रोजी जसापूर तलावातून गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नळातून चहाच्या रंगाचे गढूळ पाणी आल्याने दोन्ही गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.

या गंभीर परिस्थितीत बांबरडा येथील पोलीस पाटील मोहित बगलेकर यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत पाणी उकळूनच पिण्याचा सल्ला दिला आहे.

सविस्तर वृत्त असे की, बांबरडा व बोरखेडी या दोन्ही गावांमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. खडकाळ भूभागामुळे येथील विहिरी डिसेंबर महिन्यापर्यंत कोरड्या पडतात. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक नळ योजनेअंतर्गत विहिरींचे गाळ उपसा व खोलीकरण न झाल्याने समस्या अधिक तीव्र झाली आहे. दरवर्षी निधी मंजूर होऊनही ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कामे रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागविल्यानंतर ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता समोर आल्याचा दावा नागरिकांनी केला असून मंजूर निधीचा गैरवापर झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पाणीटंचाईवर पर्यायी उपाय म्हणून जसापूर तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र तांत्रिक बिघाडामुळे दि. २ मे रोजी दिवसभर गढूळ पाणीपुरवठा सुरू राहिला. हे पाणी घराघरात पोहोचताच दोन्ही गावांमध्ये एकच खळबळ उडाली.

ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटील मोहित बगलेकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आढळले. ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद होते, तर गटविकास अधिकारी कार्यालयातही संबंधित अधिकारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. गावकऱ्यांनी तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

(मोहित बगलेकर, पोलीस पाटील, बांबरडा)

“गेल्या चार दिवसांपासून बांबरडा व बोरखेडी गावात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उलट्या, मळमळ व चक्कर येण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांना आरोग्य केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!