प्रतिनिधि यवतमाळ-/ राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळच्या आशीर्वादाने आणि भ्रष्ट कारभारामुळे कळंब तालुक्यातील अवैध दारू विक्रीने सीमा ओलांडली आहे. यवतमाळ उत्पादन शुल्क विभागाच्या छत्राखाली चालणाऱ्या मनिष जयस्वाल याच्या कळंब येथील देशी-विदेशी दारूच्या वाईन्शॉपमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मध्यप्रदेशातील दारूची उघड-उघड आणि सर्रास विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केवळ स्वतःचा खिसा भरण्याच्या आणि अफाट नफा कमविण्याच्या हव्यासापोटी वाईन्शॉपधारक नागरिकांच्या जिवाशी खेळत असून, या संपूर्ण काळ्याबाजाराला यवतमाळच्या उत्पादन शुल्क विभागाचे मूकसमर्थन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कळंब येथील या वाईन्शॉपमधून ही विषारी व प्रतिबंधित दारू थेट जिल्ह्यात आणि इतर भागांत बेकायदेशीररीत्या वाहतूक करून पुरवली जात आहे. विशेष म्हणजे, बंदी असलेल्या दारूची विक्री मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि प्राणघातक ठरू शकते, याची पूर्ण कल्पना असतानाही वाईन्शॉप चालक मनिष जयस्वाल हा दारूचा अवैध साठा करून विक्री करत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, या बेकायदेशीर साखळीवर नजर ठेवण्यासाठी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने पूर्णपणे डोळे मिटून घेतले आहेत. या पथकाकडून आजवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ज्यामुळे या भरारी पथकाच्या अस्तित्वावरच आता मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. नियम आणि कायद्यांना हरताळ फासत या वाईन्शॉपमध्ये दररोज किती दारू येते आणि किती विकली जाते, याचे साधे ‘स्टॉक रजिस्टर’ किंवा ‘विक्री रजिस्टर’ सुद्धा मेन्टेन केले जात नाही. शासकीय नियमांनुसार वाईन्शॉपची नियमित तपासणी करणे आणि साठ्याची नोंद तपासणे हे संबंधित अधिकाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, यात प्रचंड मोठे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने नियमांची पायमल्ली केली जात आहे.
एस. व्ही. बोधे (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क) एम. पी. चिटमटवार (दुय्यम निरीक्षक)
राजेश तायकर (दुय्यम निरीक्षक)
वरील जबाबदार अधिकाऱ्यांकडून या वाईन्शॉपची कोणतीही नियमित किंवा औचक तपासणी केली जात नाही. अधिकारी आणि वाईन्शॉप चालकाचे संगनमत एवढे घट्ट आहे की, कायदा आणि प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही. कळंबमधील वाईन्शॉपमधून सुरू असलेला हा अधाधुंद कारभार केवळ आणि केवळ “महिन्याकाठी ठरलेल्या जाडजूड हप्त्यांमुळे” सुरू असल्याचा थेट आरोप नागरिकांमधून केला जात आहे. हप्त्याची रकम वेळेवर मिळत असल्याने यवतमाळचे संबंधित अधिकारी या काळ्याबाजाराकडे कानाडोळा करत आहेत. मध्यप्रदेशातून येणारी दारू ही बनावट, भेसळयुक्त आणि अत्यंत विषारी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात जर या विषारी दारूमुळे एखादी मोठी जीवितहानी झाली किंवा दारूची भीषण दुर्घटना घडली, तर याला वाईन्शॉप चालक मनिष जयस्वाल याच्यासोबतच निरीक्षक एस. व्ही. बोधे, दुय्यम निरीक्षक एम. पी. चिटमटवार आणि दुय्यम निरीक्षक राजेश तायकर हेच पूर्णपणे जबाबदार असतील.
शासकीय महसुलाचा करोडो रुपयांचा दुहेरी फटका आणि नागरिकांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी राज्य शासनाने व उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ आयुक्तांनी तात्काळ या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
कळंब येथील मनिष जयस्वाल याच्या वाईन्शॉपचा परवाना तात्काळ रद्द करावा.
मध्यप्रदेशातील बंदी घातलेल्या दारूचा साठा जप्त करून गुन्हे दाखल करावेत.
हप्तेखोरीत सामील असलेल्या निरीक्षक एस. व्ही. बोधे, एम. पी. चिटमटवार आणि राजेश तायकर यांच्यावर तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी लावावी.यवतमाळ जिल्ह्यातील या दारू माफियांचा आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटना आक्रमक पवित्र्यात आल्या आहेत.(क्रमशः)