🔥हाच तो यवतमाळात बनावट विदेशी दारूचे घबाड; मुख्य सूत्रधार शुभम जयस्वाल व मनिष जयस्वाल ’वर मेहेरबानी का?🔥हेच ते उपआयुक्त पराग नवलकर,अधीक्षक प्रमोद सोनोने संशयाच्या भोवऱ्यात!🔥मद्य माफिया मोकाट, केवळ प्याद्यांना अटक!🔥यवतमाळ उत्पादन शुल्क विभागाची कारवाई की आर्थिक तडजोडीचा बनाव?
यवतमाळ -/स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून यवतमाळ शहरात बनावट विदेशी दारूच्या अड्ड्यावर टाकलेला छापा म्हणजे केवळ ‘डोळ्यात धूळफेक’ ठरल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे. अमरावतीचे विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर आणि यवतमाळचे उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचा गवगवा करण्यात आला असला, तरी या काळ्या साम्राज्याचे खरे सूत्रधार असलेल्या अकोलाबाजार येथील शुभम जयस्वाल व कळंब येथील मनिष जयस्वाल या जोडगोळीला पाठीशी घालण्याचे काम खुद्द विभागाकडूनच होत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. लाखो रुपयांचा बनावट विदेशी मद्यसाठा जप्त होऊनही मूळ म्होरक्यांना साधी चौकशीची नोटीससुद्धा न धाडल्याने उत्पादन शुल्क विभागातील ‘अर्थकारणाची’ पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे उघड झाले आहे. स्वातंत्र्यदिनी गुप्त माहितीच्या आधारे दुय्यम निरीक्षक (बिट क्र. २) राजेश तायकर यांच्या पथकाने भोसा रोडवरील सूर्योदय सोसायटी तसेच लोहारा येथील श्रीराम टावर्स, मामानगर परिसरात संयुक्त छापा टाकला. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूवर महाराष्ट्राचे बनावट लेबल्स लावून विक्रीसाठी सज्ज ठेवलेला मोठा साठा जप्त करण्यात आला यामध्ये रॉयल स्टॅग (गोवा निर्मित): १८० मि.ली. क्षमतेच्या २५२ बाटल्या (महाराष्ट्र निर्मितीचे बनावट लेबल्स). इंपिरीअल ब्ल्यू (गोवा निर्मित): १८० मि.ली. क्षमतेच्या ११७ बाटल्या (बनावट लेबल्ससह). मास्टर डिलाईट (महाराष्ट्र निर्मित): १८० मि.ली. क्षमतेच्या १०१ कंपनी सीलबंद बाटल्या. याप्रकरणी घटनास्थळावरून धनराज अशोक यादव (वय ४०, रा. सूर्योदय सोसायटी, भोसा रोड) याला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार अतिकेश विजय पवार (रा. श्रीराम टावर्स, लोहारा) हा फरार घोषित करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई)(डी), ८१, ८३, ९० व १०८ अन्वये गुन्हा क्र. २९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळ आणि लगतच्या वर्धा जिल्ह्यात गोवा बनावटीची अवैध दारू आणून तिच्यावर महाराष्ट्राचे हुबेहूब बनावट लेबल चढवून ती चढ्या भावाने विकण्याचे मोठे सिंडिकेट कार्यरत आहे. या सिंडिकेटची सूत्रे अकोलाबाजारचा शुभम जयस्वाल आणि कळंबचा मनिष जयस्वाल यांच्या हातात असल्याचे लपून राहिलेले नाही. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात बनावट दारू पोहोचवणारे हे रॅकेट उघडे पडले असताना, छाप्यादरम्यान प्रत्यक्ष माल सापडल्यानंतरही या दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे धाडस उत्पादन शुल्क विभागाने का दाखवले नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर आणि अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या नेतृत्वाखाली केवळ हाताखालील कामगारांवर (प्याद्यांवर) कारवाई करून मूळ मालकांना अभय देण्याचा खेळ सुरू आहे. बनावट विदेशी दारूमुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असताना, कोट्यवधींच्या या अवैध धंद्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केली जात आहे. तपासाची चक्रे मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्याऐवजी तिथेच का थांबली? यामागे उत्पादन शुल्क विभाग आणि मद्य तस्कर यांच्यात मोठे आर्थिक साटेलोटे तर नाही ना, अशी उघड चर्चा आता प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केवळ एका आरोपीला गजाआड करून व एकाला फरार दाखवून या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जर शुभम जयस्वाल आणि मनिष जयस्वाल यांच्यावर तात्काळ कठोर कलमान्वये कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या संशयास्पद भूमिकेविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा आणि थेट गृह खात्याकडे या आर्थिक लागेबांध्यांची तक्रार करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.(क्रमशः)