आसमा बहुउद्देशीय’च्या संजीवनी शाळेत कोट्यवधींच्या अनुदानाचा अपहार!
🔥मुख्याध्यापिका फरिदा शेख लाल खान पठाण.
🔥आसमा बहुउद्देशीय’च्या संजीवनी शाळेत कोट्यवधींच्या अनुदानाचा अपहार!
🔥मुख्याध्यापिका फरिदा शेख लाल खान पठाण यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर
यवतमाळ -/ समाजातील सर्वाधिक उपेक्षित आणि असहाय्य असलेल्या मतीमंद व दिव्यांग बालकांच्या हक्कांवर गदा आणत शासकीय अनुदानावर स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा संतापजनक प्रकार यवतमाळ शहरात उघडकीस आला आहे. पांढरकवडा रोडवरील ‘आसमा बहुउद्देशीय संस्था’ संचलित ‘संजीवनी निवासी मतिमंद शाळा’ ही मतीमंद मुलांच्या उद्धारासाठी नसून मुख्याध्यापिका फरिदा शेख लाल खान पठाण यांच्या आर्थिक फायद्याचे केंद्र बनल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काचा पौष्टिक आहार, शैक्षणिक साहित्य आणि थेट शासकीय वेतनाचा अपहार करून मुख्याध्यापिका स्वतःची तिजोरी भरत असल्याच्या तक्रारीने शिक्षण व समाजकल्याण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून मुख्याध्यापिका फरिदा शेख यांच्यावर तात्काळ सेवासमाप्ती व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
मुख्याध्यापिका फरिदा शेख यांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून शासकीय नियमांची उघडपणे पायमल्ली केली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबातील दोन निकटवर्तीयांना (ज्यामध्ये एक स्वयंपाकी/खानावळ कर्मचारी व एक लिपिक/क्लार्क) शाळेच्या अधिकृत पटावर शासकीय वेतनावर नियुक्त केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दोन्ही कर्मचारी कधीही शाळेतील दिव्यांग मुलांच्या सेवेसाठी किंवा प्रशासकीय कामकाजासाठी उपस्थित नसतात. त्यांचा पूर्ण वेळ मुख्याध्यापिका फरिदा शेख यांच्या वैयक्तिक घरातील कामे आणि खाजगी सेवेत जातो. मात्र, दरमहा त्यांचे शासकीय वेतन शाळेच्या तिजोरीतून नियमितपणे उचलले जात असून, हा थेट शासनाची फसवणूक आणि आर्थिक अपहाराचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे.
शासनाकडून मिळणारे अनुदान लाटण्यासाठी शाळेच्या अधिकृत नोंदवहीवर मोठ्या प्रमाणावर बोगस आणि खोटी विद्यार्थी संख्या दर्शवण्यात आली आहे. प्रत्यक्षात शाळेत उपस्थित असणाऱ्या मतीमंद मुलांची संख्या कागदोपत्री आकड्यांच्या निम्म्यापेक्षाही कमी (अत्यंत नगण्य) आहे. केवळ प्रतिविद्यार्थी मिळणारे शासकीय अनुदान आणि विविध शासकीय योजनांचा निधी खिशात घालण्यासाठी निष्पाप मुलांच्या नावावर हा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप आहे.
संजीवनी निवासी मतिमंद शाळेतील बालके ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या विशेष गरजा असणारी आहेत. ही मुले स्वतःचे हक्क मागू शकत नाहीत किंवा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवू शकत नाहीत. याच असहाय्यतेचा गैरफायदा घेत मुख्याध्यापिका फरिदा शेख यांनी शासनाकडून मिळणाऱ्या पौष्टिक आहार आणि पोषण अनुदानाचा मोठा हिस्सा परस्पर लाटला आहे. प्रत्यक्षात या निवासी विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट, अपुरा आणि दर्जाहीन आहार देऊन त्यांचे अतोनात हाल केले जात आहेत.
शासनाकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या या शाळेची स्वतःची साधी हक्काची इमारत किंवा नियमानुसार आवश्यक असणारे सुरक्षित क्रीडांगण व पायाभूत सुविधा नाहीत. एका अत्यंत असुरक्षित, तोकड्या आणि अस्वच्छ भाड्याच्या जागेत ही शाळा रेटली जात आहे. आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, प्रथमोपचार, रुग्णवाहिका संपर्क किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी यांसारख्या अत्यंत मूलभूत बाबींचा या ठिकाणी पूर्णपणे अभाव आहे.
दिव्यांग बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी मिळणारे विशेष शैक्षणिक साहित्य, व्हिलचेअर, श्रवणयंत्रे व वैद्यकीय उपचार साधनांचा मोठ्या प्रमाणावर अपहार करण्यात आला आहे. तसेच, शाळेत विशेष प्रशिक्षित शिक्षकांची कागदोपत्री नावे दाखवून प्रत्यक्षात अप्रशिक्षित व मुख्याध्यापिकेच्या नातेवाईकांकडून वर्ग भरवले जात आहेत. शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बळजबरीने कपात करणे, कोऱ्या पावत्यांवर किंवा व्हाउचर्सवर सह्या घेऊन रोख रक्कम वसूल करणे आणि कोणी आवाज उठवल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, असा हुकूमशाही कारभार मुख्याध्यापिका फरिदा शेख यांच्याकडून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे.(क्रमशः)
ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ
