यवतमाळ -/ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून मिरवणाऱ्या आर्णी पोलीस ठाण्याचा कारभार सध्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मनमानी आणि लाचखोरीमुळे पार रसातळाला पोहोचला आहे. ठाणेदाराचा तथाकथित ‘खास’ समजला जाणारा रायटर गुणवंत बोईनवाड याने रेती तस्करांकडून तब्बल ४ लाख रुपयांची माया गोळा करून अवैध धंद्यांना मोकळे रान करून दिले. मात्र, ‘हप्ता देऊनही’ अरुणावती नदीपात्रात एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याने छापा टाकून ट्रक पकडल्याने हा संपूर्ण लाचखोरीचा बाजार उघड्यावर आला आहे. संतापलेल्या तस्करांनी थेट पोलीस ठाणे गाठून पैशांचा जाब विचारत आर्णीतील अवैध धंद्यांचा पाढाच ठाणेदाराच्या तोंडावर भिरकावला. या खळबळजनक प्रकारामुळे पोलीस दलाची अब्रू चव्हाट्यावर आली असून खाकी वर्दीवर भ्रष्टाचाराचा काळा डाग लागला आहे.
आर्णी परिसरातील अरुणावती नदीच्या पात्रातून रात्री-अपरात्री वाळूची प्रचंड लूट सुरू आहे. हा काळा धंदा बिनदिक्कत सुरू राहावा यासाठी रेती तस्करांनी ठाणेदाराचा रायटर गुणवंत बोईनवाड याच्याशी ‘अर्थपूर्ण’ मांडवली केली होती. बोईनवाड याने रेती तस्करांना कारवाई न करण्याचे पूर्ण अभय देत ४ लाख रुपयांची गलेलठ्ठ लाच उकळली.
लाच दिल्यानंतर ‘आता आपल्याला कोणी हात लावू शकत नाही’ या तोऱ्यात आरोपी करण काशिनाथ माघाडे आणि गजेंद्र सिताराम झळके हे अरुणावती पात्रातून रेतीची वाहतूक करत होते. मात्र, याच दरम्यान आर्णी पोलीस ठाण्यातील एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने धडक कारवाई करत त्यांच्या ताब्यातील रेतीने भरलेला ट्रक जागीच जप्त केला. ट्रक जप्त होताच आणि गुन्हा दाखल होण्याची वेळ येताच ट्रक मालकांचा पारा चांगलाच भडकला. हप्ता देऊनही गाडी पकडली गेल्याने संतापाने लालबुंद झालेल्या ट्रक मालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून रायटर गुणवंत बोईनवाड याला अक्षरशः धारेवर धरले. “४ लाख रुपये घेऊनही गाडीवर कारवाई कशी झाली? आमचे पैसे ताबडतोब परत कर,” अशी उघड मागणी लावून धरली. तस्करांचा आक्रमक पवित्रा पाहताच लाचखोर रायटर बोईनवाडचे धाबे दणाणले. त्याने वेळ मारून नेण्यासाठी “माझ्याकडे पैसे नाहीत, मी ठाणेदारांशी बोलतो,” असा बनाव रचत पळवाट काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तस्करांनी पैसे वसूल केल्याशिवाय न हटण्याचा पवित्रा घेतल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रायटरकडून टाळाटाळ होत असल्याचे पाहून ट्रक मालकाने आपला मोर्चा थेट ठाणेदाराच्या कक्षाकडे वळवला. ठाणेदारासमोर जाऊन रोख पैशांच्या देवाणघेवाणीचा जाब विचारला असता, आपली पोलखोल होईल या भीतीने ठाणेदाराने उलट ट्रक मालकाचीच चांगलीच खरडपट्टी काढली आणि त्याला तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.
या अपमानामुळे आणखी चिडलेल्या ट्रक मालकाने आर्णी तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा संपूर्ण कच्चा चिट्ठा आणि यादीच ठाणेदाराच्या टेबलवर आदळली. “या सर्व धंद्यांवर कारवाई करून दाखवा,” असे थेट आव्हान तस्कराने पोलिसांना दिले. मात्र, एवढा मोठा पुरावा आणि आरोप समोर येऊनही ठाणेदाराने त्या अवैध धंद्यांवर कोणतीही कारवाई न करता संशयास्पद मौन बाळगणे पसंत केले. यामुळे ठाणेदाराचे या लाचखोरीला मूकसमर्थन आहे की काय, असा संशय आता जनतेतून व्यक्त होत आहे. गुणवंत बोईनवाडची मुजोरी केवळ रेती तस्करांपुरती मर्यादित नाही. आर्णी शहर आणि परिसरात प्रतिबंधित गुटख्याचा महापूर आला असून, यामागे असलेला कुख्यात जयस्वाल आणि महेबुब यांच्या गुटखा सिंडिकेटला रायटर बोईनवाडचाच उघड वरदहस्त असल्याची चर्चा पोलीस दलात आणि शहरात उघडपणे सुरू आहे.
ठाणेदाराला अंधारात ठेवून किंवा ठाणेदाराच्या नावाचा वापर करून परस्पर लाच गोळा करणे, गुटखा आणि रेती तस्करांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे हा बोईनवाडचा नित्यक्रम बनला आहे. गुटखा माफियांना पोलिसांची कोणतीही भीती उरलेली नसून, शहरात तरुणाईच्या नसानसांत विष कालवणाऱ्या या तस्करांकडून दरमहा लाखोंची खंडणी लाटण्याचे काम हा रायटर करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आर्णी पोलीस ठाण्यातील एका लाचखोर कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासनाची मान शरमेने खाली गेली आहे. स्वतःला ठाण्याचा ‘सुपर ठाणेदार’ समजणाऱ्या गुणवंत बोईनवाडवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याची खात्यांतर्गत चौकशी करणे गरजेचे आहे.
चार लाखांची लाच उघडपणे मागणारा आणि पचवणारा हा कर्मचारी सेवेत कसा राहू शकतो?
तस्कराने समोर आणलेल्या अवैध धंद्यांच्या यादीवर अद्याप आर्णी पोलिसांनी बुलडोझर का फिरवला नाही?
जयस्वाल आणि महेबुबच्या गुटखा तस्करीची पाळेमुळे कधी खणून काढणार?
हे प्रश्न आज आर्णीची सामान्य जनता विचारत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेऊन भ्रष्ट रायटर गुणवंत बोईनवाडची तात्काळ हकालपट्टी करावी आणि संपूर्ण आर्णी पोलीस ठाण्याच्या संशयास्पद कारभाराची सीआयडी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशी करावी, अन्यथा जनतेचा खाकीवरील विश्वास कायमचा उडून जाईल.(क्रमशः)