बाभुळगावात रेतीमाफियांचे तांडव : महसूल-पोलीस प्रशासनाच्या संगनमताने बेंबळा, वर्धा नद्यांचे लचके!

0

🔥बाभुळगावात रेतीमाफियांचे तांडव : महसूल-पोलीस प्रशासनाच्या संगनमताने बेंबळा, वर्धा नद्यांचे लचके!🔥सौभाग्यवती मीरा किशोर पागोरे तहसीलदार बाभूळगाव🔥पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे पोलीस स्टेशन बाभूळगाव जिल्हा यवतमाळ

🔥​तडीपार गुन्हेगारांचे वर्चस्व, अधिकाऱ्यांच्या पार्ट्या आणि महिन्याकाठी लाखो रुपयांचे हप्ते

🔥तहसील कार्यालयासमोरूनच तस्करीची वाहने सुसाट

 🔥पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे,मीरा किशोर पागोरे चे वसुली अधिकारी तैनात 

🔥जिल्हाधिकारी विकास मिना च्या आदेशाचे सर्रास उल्लघंन 

यवतमाळ -/ यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उघड छत्रछायेखाली कोट्यवधी रुपयांची अवैध रेती तस्करी सुरू असून, बेंबळा आणि वर्धा नदीपात्रातून रात्रंदिवस अवैध रेतीचा बेसुमार उपसा केला जात आहे. तडीपार गुंड, गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेले समाजकंटक आणि जिल्ह्याबाहेरील टोळ्यांच्या हाती तालुक्याची खनिज संपत्ती सोपवून भ्रष्ट यंत्रणा मालामाल होत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) केला आहे. महसूल विभागातील काही तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलचे कर्मचारी रेती तस्करांसोबत हॉटेलांमध्ये पार्ट्या झोडत असून, संपूर्ण यंत्रणेलाच ‘लाखो रुपयांच्या हप्त्यांची’ लागण झाल्याने प्रशासनाने डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधल्याचे संतप्त चित्र निर्माण झाले आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा व वर्धा या जीवनदायिनी नद्या रेतीमाफियांच्या नफेखोरीत उद्ध्वस्त होत आहेत. या अवैध उपशावर स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांनी संपूर्ण पकड मिळवली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवले आहेत. ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झाली आहे, अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद शिरावर असलेले गुन्हेगार आणि जिल्ह्याबाहेरून आलेले रेती तस्कर खुलेआम पोकलेन व जेसिबीच्या साहाय्याने नद्यांचे उदर फाडत आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये या टोळ्यांची दहशत पसरली असून, स्थानिक प्रशासन मात्र या टोळ्यांसमोर हतबल नव्हे, तर भागीदार बनून वावरत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे.

               अवैध रेती वाहतुकीच्या या काळ्या बाजारामागे महसूल व पोलीस विभागातील काही भ्रष्ट घटकांचे अभद्र युतीचे नेटवर्क सक्रिय आहे. रेती तस्करांच्या दाव्यानुसार, महसूल व पोलीस ठाण्याला दरमहा लाखो रुपयांचे हप्ते नियमित पुरवले जातात. ज्या तस्करांचा हप्ता वेळेवर टेबलाखाली पोहोचतो, त्यांची एकही गाडी अडवली जात नाही. मात्र, एखाद्या छोट्या रेती चोराने हप्ता देण्यास नकार दिला किंवा हप्ता पोहोचण्यास उशीर झाला, तर लगेच कर्तव्यदक्षतेचे सोंग आणून संबंधित तलाठी-पटवारी त्या वाहनावर कारवाईचा बडगा उगारतात. या क्षेत्राशी संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कर्मचारी राजरोसपणे तस्करांसोबत महागड्या हॉटेलांमध्ये मद्य-मां wire साच्या पार्ट्या झोडताना दिसत असल्याने ‘रक्षकच भक्षक’ बनल्याचे उघड झाले आहे. नांदेसावंगी, मुबारकपूर, वाटखेड, मांगसावंगी आणि तांभा ही गावे रेती उपशाचे मुख्य केंद्र बनली आहेत. या भागांतून शेकडो टिप्पर, ट्रॅक्टर आणि डंपर दिवस-रात्र रेती भरून सुसाट धावत आहेत. विशेष म्हणजे, कोणतीही लपवाछपवी न करता, गुन्हेगार दिवसाढवळ्या थेट बाभुळगाव तहसील कार्यालयाच्या समोरूनच मुजोरीने रेतीची वाहने नेत आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाला हे चित्र दिसत नाही काय, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी प्रशासकीय लाचारी निर्माण झाल्याने डोळे उघडे असूनही प्रशासन आंधळे बनले आहे. 

                   रेतीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने नेमलेली भरारी आणि तपास पथके केवळ कागदावरच मर्यादित राहिली आहेत. प्रत्यक्षात हीच पथके तस्करांशी आर्थिक तडजोडी करण्यात व्यस्त असल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे या नेमलेल्या पथकांच्या संशयास्पद कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि प्रशासनात बसून रेतीमाफियांचे हित जपणारे अंतर्गत ‘विभीषण’ शोधून त्यांच्यावर तत्काळ कठोर निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे लावून धरण्यात आली आहे. 

                 तालुक्यातील या कोट्यवधी रुपयांच्या समांतर काळ्या अर्थकारणावर आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या अवैध धंद्यावर तातडीने पूर्ण अंकुश लावण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) बाभुळगाव शहराध्यक्ष सय्यद जहीर सय्यद रज्जाक यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. येत्या आठ दिवसांत तालुक्यातील बेंबळा-वर्धा नदीपात्रातील अवैध उपसा आणि वाहतूक पूर्णपणे बंद झाली नाही, तर या बेकायदेशीर धंद्याला प्रशासनाचीच मूकसंमती असल्याचे मानून माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर तीव्र व आक्रमक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा पक्षाने दिला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!