संपादक रविंद्र कोटंबकार यांच्यावरील हल्ल्याचा खामगाव येथे जाहीर निषेध
प्रतिनिधी / खामगाव :
वर्धा येथील दै. साहसिकचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकार यांच्यावर झालेल्या जिवघेणा हल्ल्याचा निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार बांधवांच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनामध्ये नमुद आहे की, वर्धा येथून प्रकाशित दै.साहसिक या वृत्तपत्राचे मुख्य संपादक रविंद्र कोटंबकार हे कामानिमित्त गेले होते. दि.१८ एप्रिल २०२२ रोजी रात्री घरी परतत असताना वर्धा जिल्ह्यातील पवनार गावाजवळ हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात रविंद्र कोटंबकार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. रविंद्र कोटंबकार हे निर्भिडपणे लिखान करतात. त्यांनी अनेक गंभीर गुन्हे, भ्रष्टाचार उघड करण्याचे काम केले आहे. यामुळे काही दिवसांपुर्वी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या सुध्दा आल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी वर्धा जिल्ह्याचे एसपी, मुख्यमंत्री, गृहमंत्री, ठाणेदार यांच्याकडे लेखी तक्रार करून पोलिस संरक्षणाची मागणी सुध्दा केली होती. दरम्यान पोलिसांकडून त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. आणि १८ एप्रिल रोजी हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवत जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून गंभीर अवस्थेत त्यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पत्रकारावर हसा हल्ला करणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची ही मुस्कटदाबी असून याचा आम्ही पत्रकार बांधव जाहीर निषेध करतो. या हल्ल्यामागे काही राजकीय पुढाऱ्यांचा हात असल्याने या घटनेची निष्पक्ष चौकशी करून या घटनेतील हल्लेखोरांचा तात्काळ शोध घेवून त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी खामगाव प्रेस क्लब खामगावचे अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, सचिव अनिल खोडके, प्रशांत देशमुख, शरद देशमुख, योगेश हजारे, धनंजय वाजपे, अनुप गवळी, नाना हिवराळे, नितेश मानकर, किशोर होगे, मोहन हिवाळे, मुबारक खान, महेश देशमुख, सिध्दांत उंबरकार, आनंद गायगोळ, महेंद्र बनसोड, गणेश पानझाडे, कुणाल देशपांडे, शिवाजी भोसले, आकाश पाटील, वैभव देशमुख, नितीन इंगळे, निखिल देशमुख, मनोज नगरनाईक, सैय्यद अकबर, शेख सलीम यांच्यासह खामगाव शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.