🔥मोबाईलवर बोलतांना गॅसवर साडीचा पदर पडल्याने लागली होती आग.
🔥सेवाग्राम इस्पितळात सुरू होते उपचार.
सिंदी (रेल्वे) /मोबाईलवर बोलत असतांना अचानक वादळी वाऱ्याने गॅसवर साडीचा पदर पडल्याने साडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये दुर्गा नितीन नाकाडे वय 35 वर्ष ही महिला 60 टक्के जळाली. दरम्यान, सेवाग्राम इस्पितळात तिच्यावर उपचार सुरू असताना अखेर आठ दिवसानंतर दुर्गाची मृत्यूशी झुंज संपली. तिच्या मृत्यूमुळे तिचे दोन लहान मुले पोरखे झाले असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार कांढळी नाका परिसरात दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी अंदाजे 7.30 वाजताच्या सुमारास घरात गॅसवर स्वयंपाक करत असताना दुर्गा नितीन नाकाडे ही महिला मोबाईलवर बोलत होती. दरम्यान, वातावरणात अचानक बदल झाल्याने वादळी वाऱ्याने घरातील इलेक्ट्रिक लाईन बंद झाली. त्यावेळी सुसाट सुटलेल्या वाऱ्याने अचानक दुर्गाचा साडीचा पदर गॅसवर पडल्याने तिला आग लागली. दरम्यान, घरात तिचे दोन मुले असल्याने मुलांना सुद्धा आग लागेल या भीतीने दुर्गा किंचाळी फोडत घरातून बाहेर येऊन अंगणात बसली. यावेळी शेजारी राहणाऱ्या एका इसमाने मोठ्या शिताफीने तिच्याकडे धाव घेत तिच्या अंगावर पाणी टाकून विझविले.
घटनेची माहिती तिचा पती नितीन नाकाडेला मिळताच पतीने तातडीने सिंदी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यामुळे पोलीस अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल होऊन दुर्गाला रुग्णवाहिकेच्या साह्याने सेवाग्राम येथील इस्पितळात पाठविले. या आगीत दुर्गा 60 टक्के जळाली. दरम्यान, सेवाग्राम इस्पितळात दुर्गावर आठ दिवस डॉक्टरांनी उपचार केलेत परंतु, 25 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास दुर्गाची प्राणज्योत मावळली. दुर्गाला एक मुलगा एक मुलगी असून तिच्या मृत्यूने दोन्ही लहान मुले पोरखे झाले असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुर्गावर 25 मार्च रोजी दुपारी स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.