शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा अहवाल आठवड्यात सादर करा – पालकमंत्री सुनील केदार
प्रतिनिधी/वर्धा
वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम होत असतांना मार्गाचे पिल्लर पाटबंधारे विभागाच्या कालव्यात उभे करण्यात आले, यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अहवाल एक आठवड्यात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.
समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री.केदार यांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ सिंचन भवन नागपूर येथे विशेष बैठक घेतली.
बैठकीला पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री.पवार, अधीक्षक अभियंता श्री.गवळी, कार्यकारी अभियंता श्रीमती चव्हाण, उपविभागीय अभियंता श्री.हिंगे व महामार्ग प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही राज्याच्या आर्थिक जडणघडणीत दळणवळण साधनांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते. त्यामुळे ज्या राज्यात किंवा शहरात चांगले रस्ते निर्माण होत असतात त्या परिसराचा विकास हा मोठ्या प्रमाणात होत असतो. परंतु कधी कधी होणारा विकास जर विनाशाच्या मार्गावर जात असेल तर त्याला वेळेवर आवर घालणे महत्त्वाचे असते. असेच प्रकरण नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग बांधकाम होत असतांना झाले आहे. वर्धा जिल्ह्यात महामार्गाचे पिल्लर पाटबंधारे विभागाच्या कालव्यात उभे केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
सेलू तालुक्यातील सेलडोह अंतर्गत बोर प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कालव्याच्या लगतच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिल्लरच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा आजूबाजूच्या शेतात होत असल्यामुळे संपूर्ण पिकांची नासाडी होत आहे. त्याचप्रमाणे कालव्याला झालेल्या नुकसानीमुळे पुढील शेतकऱ्यांना ऐन हंगामात पाणी मिळणे कठीण झाले आहे.
ही सर्वस्वी जबाबदारी समृद्धी महामार्ग प्रशासनाची असून संपूर्ण शेतकऱ्यांची नुकसानभरपाई समृद्धी प्रशासनाकडून वसूल करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. या बैठकीत पालकमंत्री सुनील केदार यांनी कार्यकारी अभियंता यांना बाधित शेतकऱ्यांचा अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे मुख्य अभियंता जलसंपदा यांनी समृद्धीमुळे कालवा वितरण प्रणालीच्या नुकसानीचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश दिले. समृद्धी महामार्गामुळे नुकसान झालेल्या कालव्याची दुरुस्ती समृद्धी प्रशासनानेच त्वरित करून देण्याचे व शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई अहवाल कृषी विभाग व महसूल विभागाने तात्काळ सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले.