🔥वैद्यकिय महविद्यालय हिंगणघाट येथेच निर्माण करण्याची केली मागणी.
हिंगणघाट -/ येथील प्रास्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे, या मागणीसाठी आज संघर्ष समितीच्या कैलास मसराम या कार्यकर्त्यांने स्थानिक रामनगर वार्डातील जलकुंभावर चढून ३ तास पर्यंत आंदोलन केले.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर यांचेसह समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होत्या.हिंगणघाट शहरातच नव्याने मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात यावे, यासाठी समिती तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, काल वर्धा येथे यासाठी जिल्हाधिकाऱ्यासह सरकारकडे मागणीचे निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे.नुकत्याच ९ ऑगस्ट रोजी शहरात आयुर्विज्ञान समितीच्या तिन सदस्य समितीने आ.समीर कुणावार यांचेसह हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव (बो), गव्हा(कोली), कुटकी, तसेच समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील जागेची पाहणी केली.
या शासकीय समितीच्यावतीने शासनाला वैद्यकीय महाविद्यालयाचे जागा निश्चिती संबंधात अहवाल लवकरच सादर केला जाणार असून प्रास्तावित वैद्यकीय महाविद्यालयाची अंतिम जागा ठरवीली जाऊ शकते.
आमदार कुणावार यांनी जागा पाहणीचे दरम्यान हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे लगतच्या जागेला समितीच्या वतीने प्राधान्य देण्यात यावे असे आवाहन केले होते, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्यावतीने नुकत्याच पाहणी करून गेलेल्या त्रि-सदस्यीय
आयुर्विज्ञान समितीने समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील कृषी विभागाच्या जागेला प्राधान्यक्रम दिला असल्याचा संघर्ष समितीचा अंदाज आहे.यावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती मध्ये असंतोष उफाळला असून सदर शासकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच निर्माण करण्यात यावे,यासाठी आज पुढाकार घेऊन कैलास मसराम या तरुणाने जलकुंभावर चढून दुपारी १२ वाजताचे दरम्यान प्रशासनाला आवाहन देत आपल्या मागणीचा पुरस्कार केला, सदर आंदोलनाची माहिती मिळताच नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार योगेश शिंदे, नायब तहसीलदार सागर कांबळे यांचेसह महसूल कर्मचारी व पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली, तब्बल तीन तास सुरू असलेल्या या आंदोलना दरम्यान माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी मध्यस्थी करीत हे आंदोलन मागे घेण्यास सहकार्य केले.
यानंतर कैलास मसराम तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे दालनात बैठक घेण्यात आली, उपविभागीय अधिकारी सवरंगपते यांनी स्वतः या जागेची पाहणी करून वरिष्ठांना लवकरच अहवाल सादर करू असे सांगितले, या वाटाघाटीचेवेळी माजी आमदार राजु तिमांडे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, पडवे सर, जगदीश वांदिले, गजू कुबडे, सुरेंद्र बोरकर, राजेश भाईमारे यांचेसह महिला पदाधिकारी रागिनी शेंडे, सुजाता जांभूळकर, सुजाता जीवनकर, विद्या गिरी, दिपाली रंगारी, सुनिता तामगाडगे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.