🔥दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास राज्यभर जेलभरो व तीव्र आंदोलन,दिलीप उटाणे.
वर्धा -/ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 21 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप केला
त्याप्रमाणे दिवसभर जोरदार निदर्शने करण्यात आली.या आंदोलनांमध्ये हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.चर्चेच्या वेळी लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह मागण्या निकाली काढण्यात येईल असे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.
शासनाला पंधरा दिवसाचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अल्टिमेटम देण्यात आलेला आहे.
दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यास राज्यभर जेलभरो व तीव्र आंदोलन करण्यात येईल असे माध्यमांशी बोलताना कृती समिती निमंत्रक व आयटक अंगणवाडी कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष– दिलीप उटाणे यांनी सांगितले.
आझाद मैदानावरील आंदोलनाच्या दरम्यान मंत्रालयातून कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी निमंत्रित केले गेले. मंत्री महोदया मुंबईत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली. बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. कृती समितीचे प्रतिनिधित्व शुभा शमीम, दिलीप उटाणे, निशा शिऊरकर, सूर्यमणी गायकवाड, भगवानराव देशमुख व सुवर्णा तळेकर यांनी केले तर प्रशासनाच्या वतीने आयसीडीएस आयुक्त कैलास पगारे, महिला व बालविकास विभाग उपसचिव ठाकुर, कक्ष अधिकारी जाधव,उपायुक्त विजय क्षीरसागर यांनी चर्चा केली.चर्चेतील प्रमुख मुद्दे -१. ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने मंजूर केला असून तो शासनाकडे सादर झाले आहेत व ते सध्या वित्त खात्यात मंजुरीसाठी गेले आहेत.2 मानधनवाढीच्या प्रस्तावाला महिला व बालविकास मंत्र्यांनी मंजुरी दिली असून तो येत्या एका आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवला जाईल.3 सर्व थकित सेवा समाप्ती लाभ देण्याचे काम मार्गी लागले आहे. लवकरच ही रक्कम मिळेल.4 सेवेची १०,२० व ३० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना ३,४,५% मानधन वाढ देण्याचा आदेश निघाल्यानंतर काही कालावधीनंतर सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळाली नव्हती त्याची प्रणाली विकसित केल्यामुळे आता ती सर्वांना मिळेल.5 नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ८ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बैठक वा अन्य कामासाठी बोलाविल्यास त्यांना टी.ए.डी.ए देण्याचे मान्य करण्यात आले.बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन मागण्या मार्गी लागल्यामुळे कृती समितीने असहकार आंदोलन व १२ ऑगस्ट पासून सुरू असलेले धरणे आंदोलन व मागील 15 जुलै पासून असहकार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. शासनाला मानधन वाढ , ग्रॅच्युइटी व पेन्शन बद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी व त्यांचे आदेश काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला. या मुदतीत शासनाने आपल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास संपूर्ण राज्यात २ लाख अंगणवाडी कर्मचारी जेल भरो आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे.आंदोलनात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.