कलाकारांकडून अर्थसहाय्यासाठी अर्ज आमंत्रित
प्रतिनिधी/ वर्धा:
लॉकडाऊनच्या काळात कलाकारांना आर्थिक उत्पन्नापासून वंचित राहावे लागले. इतर राज्यामध्ये कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठोक एकरकमी अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. त्याचधर्तीवर महाराष्ट्रात शासन निर्णयानुसार कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्याकरीता योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी एकल कलाकार(वैयक्तिक) व कलाप्रकारातील संस्था, समुह, फड व पथकांनी आर्थिक सहाय्यासाठी संबधित तहसिल कार्यालय येथे विहित नमुन्यात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
अर्जासोबत अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नसून यासाठी शासनाने कोणत्याही खाजगी व्यक्ती, संस्था, संघटना यांची नेमणूक केलेली नाही. शासननिर्णयानुसार अटी व शर्ती व प्रतिज्ञापत्र आणि इतर आवश्यक माहिती अर्जासोबत सादर करावी. अधिक माहिती https:www.mahasanskruti.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.