जयपूर येथे जलसंधारण व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वॉटरशेड यात्रा संपन्न….

0

सेलू -/ तालुक्यातील जयपूर येथे जलसंधारण विभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने वॉटरशेड यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचा प्रमुख उद्देश गावकऱ्यांमध्ये पाणी बचत, “पाणी अडवा-पाणी जिरवा” संकल्पना आणि जलसंधारणाचे महत्त्व या विषयांवर जनजागृती करणे हा होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वॉटरशेड यात्रेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना पाणी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा प्रभावी उपयोग आणि जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या अंतर्गत गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पाण्याचे महत्त्व या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कुमारी दर्पण तोडासे हिने प्रथम पारितोषिक पटकावले, द्वितीय पारितोषिक प्रियल तोडासे हिला मिळाले, तर तृतीय पारितोषिक नताशा बावणे यांना प्रदान करण्यात आले तसचे कृष्णाची धोटे यांना जलयुद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय, जलसंधारण आणि पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनावर जनजागृती करण्यासाठी पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या पथनाट्यातून पाणी वाचवण्याच्या गरजेवर प्रभावी संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाला जयपूर गावाचे सरपंच किरण अंबुलकर, उपसरपंच प्रशांत थूल, ग्रामपंचायत सदस्य गणेश तुळसकर,अस्मिता थूल, वर्षा वाघाडे, तालुका कृषी अधिकारी राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रशांत भूतकर, मृद व जलसंधारण विभागाचे अधिकारी बेंद्रे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष चव्हाण उपस्थित होते.

गावकऱ्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भविष्यात जलसंधारणाच्या उपाययोजनांमध्ये सक्रीय सहभाग घेण्याची तयारी दर्शवली. या यात्रेमुळे गावकऱ्यांमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता वाढली असून पाणी व्यवस्थापनाच्या उपयुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार करण्यात आला.

चैताली गोमासे साहसिक NEWS-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!